Kolkata Doctor Rape Case R G Kar Hospital and Sandip Ghosh : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय (Sanjoy Roy) याला पोलिसांनी अटक केली असून तो तुरुंगात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, कोलकात्याच्या आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर डॉक्टरच्या हत्या प्रकरणात पुराव्याशी छेडछाड आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमितता प्रकरणात माजी प्राचार्य संदीप घोष यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी माजी प्राचार्य संदीप घोष यांनी सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. ‘जर हे आरोप सिद्ध झाले तर फाशीची शिक्षाही होऊ शकते’, असं न्यायालयाने म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

हेही वाचा : Soundarya Balasubramani : भारतीय लेखिकेला लंडनमध्ये मारहाण, पोस्ट करत सांगितला धक्कादायक अनुभव

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं की, “केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, संदीप घोष यांच्यावरील आरोपाचे स्वरूप देखील गंभीर आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आरोपीला जामिनावर सोडणं हे समानतेच्या तत्त्वाचं उल्लंघन ठरेल”, असं न्यायालयाने घोष यांचा जामीन अर्ज फेटाळताना म्हटलं. यावेळी न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याची सीबीआयची विनंती मान्य केली. तसेच या प्रकरणात माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या वकिलांनी म्हटलं की, “संदीप घोष यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं असून त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही.”

घटना काय घडली होती?

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली होती. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा आढळल्या होत्या. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या मुलीला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata doctor case sandip ghosh if the charge is proved it can lead to death penalty an important observation recorded by the cbi court gkt