Kolkata Doctor Murder Autopsy Report : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. या बलात्कार व खून प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने राज्यभरात संप पुकारला आहे. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणारं पथक ढिसाळ काम करत असल्याच्या आरोपांनंतर, देशभरातील संतापाची लाट पाहता व घटनेचं गांभीर्य पाहून सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोवर (सीबीआय) सोपवला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचे पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेवर भाष्य केलं आहे.

गोयल यांनी या घटनेबाबत चालू असलेल्या अफवा, आरोप आणि दाव्यांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या खटल्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. कोणत्याही आधाराशिवाय काहींनी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. तथाकथित तज्ज्ञ वाट्टेल तशा कथा तयार करून पसरवत आहेत. सरकारने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो) सोपवला आहे. आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवूया. आमच्या अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. आमच्या पथकातील कोणाकडून चूक झाली असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आत्ता कोणीतरी अफवा पसरवली आहे की आम्ही पीडितेच्या पालकांना सांगितलं, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली होती. या केवळ अफवा आहेत. काहींच्या मते पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा >> Kolkata Doctor Murder : “कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर व इंटर्नही सहभागी”, पीडितेच्या आई-वडिलांनी CBI ला काय सांगितलं?

पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल काय म्हणाले?

विनीत कुमार गोयल म्हणाले, काही लोकांनी दावा केला आहे की पीडितेच्या शरिरात १५० ग्रॅम वीर्य सापडलं आहे. हा दावा देखील खोटा आहे. आमचे अधिकारी सीबीआयला लागेल ते सर्व प्रकारचं सहकार्य करत आहेत. काही लोक आमच्यावरच आरोप करत आहेत. आम्ही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे दावे करत आहेत. मला समजत नाही हे सगळं कोण करतंय? का करतंय? आम्ही सर्वांच्या उपस्थितीत घटनास्थळाची व्हिडीओग्राफी केली आहे. पीडितेचं कुटुंब देखील त्यावेळी तिथे उपस्थित होतं. आमच्या तीन सदस्यीय पथकाने मृतदेहाचा पंचनामा केला. त्याचा व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे. सीबीआयकडे पोस्ट मार्टेम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल) व व्हिडीओ देखील आहे. आमच्या किंवा सीबीआयच्या पारदर्शकलेबद्दल शंका घेऊ नका.