Kolkata Doctor Murder Case Nirbhaya’s Mother Reaction : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. १२ वर्षांपूर्वी अशाच एका बलात्काराच्या घटनेने देश हादरला होता. २०१२ मध्ये दिल्लीत एका तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील लोक रस्त्यावर उतरले होते. तब्बल आठ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर २० मार्च २०२० रोजी निर्भयाला (दिल्लीतील बलात्कार पीडितेचं बदलेलं नाव) न्याय मिळाला व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली. तेव्हा देशातील नागरिकांनी व सरकारनेही निर्धार केला होता की देशात पुन्हा अशी घटना घडता कामा नये. मात्र, आपला देश यामध्ये अपयशी ठरला आहे. कारण देशभरातील बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत. कोलकात्यातील बलात्काराच्या घटनेने लोकांना निर्भया प्रकरणाची आठवण झाली आहे.

दरम्यान, निर्भयाच्या आईने देखील कोलकाता प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “देशातील परिस्थिती अजूनही तशीच आहे”. निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी तिची आई आशा देवी यांनी अनेक वर्ष कायदेशीर लढा दिला होता. आता त्या कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्या म्हणाल्या, “कोलकात्यात डॉक्टर तरुणीबरोबर जे काही घडलं, आतापर्यंत जो काही तपास केला गेला आहे ते पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण निर्भयाचं उल्लेख करतो, मात्र गेल्या १२ वर्षांमध्ये काहीच बदललं नाही. आपण आजही २०१२ मध्येच आहोत.”

निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या, “त्या घटनेला १२-१३ वर्षे झाली, देश बदललाय, पण महिलांबरोबरचा व्यवहार, अपराथ, छळ बदललेला नाही. महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. पीडित महिलांना न्याय मिळवणं देखील अवघड आहे. पीडितांना त्यांच्या कुटुंबांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय. सरकारने कायदे बनवले खरे, परंतु त्यामुळे समाजात काही बदल झाला नाही.”

हे ही वाचा >> Kolkata Doctor Murder : पीडितेवर सामूहिक बलात्कार? पोलिसांकडून नातेवाईकांवर दबाव? सर्व आरोपांवर आयुक्तांचं स्पष्टीकरण

निर्भयाच्या आईची व्यथा

आशा देवी म्हणाल्या, “आठ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर माझ्या मुलीला न्याय मिळाला तेव्हा वाटलेलं की आता देशात अशा घटना कमी होतील. इतर पीडितांना न्याय मिळेल. छेडछाड, छळ व बलात्काराच्या घटना थांबतील. परंतु, तसं काहीच झालं नाही. २०२० मध्ये निर्भयाच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली. मात्र त्या घटनेच्या आधी व नंतरही महिलांवरील अत्याचार थांबले नाहीत. देशभरात अनेक गुन्हे झाले, त्यांचे खटले चालू आहेत. परंतु, त्यांच्यापैकी किती पीडितांना व त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला? रोज अशा घटना घडत आहेत. निर्भयाच्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्यावर असं वाटलेलं की आता आपला समाज सुधारेल. मात्र तसं झालं नाही. लोकांची मानसिकता बदलण्याची अपेक्षा होती, तेही होऊ शकलं नाही.