Kolkata Doctor Murder Whars Victim Parents Told CBI : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही इंटर्न व डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. यासह मृत तरुणीच्या आई-वडिलांचा ज्या-ज्या लोकांवर संशय़ आहे त्यांच्या नावांची यादी त्यांनी सीबीआयला दिली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
एका सीबीआय अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, पीडितेच्या आई-वडिलांनी आम्हाला सांगितली की त्यांच्या मुलीवरील बलात्कार व हत्येमागे अनेक जण असू शकतात. त्यांनी त्यांच्या मुलीबरोबर रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर व इंटर्न्सवर (प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी) संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आम्हाला काही नावं दिली आहेत.
सीबीआय सध्या सुरुवातीच्या काळात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडे चौकशी करत आहे. सीबीआयचे अधिकारी म्हणाले, “आम्ही आतापर्यंत ३० संशयितांची यादी बनवली आहे, आम्ही त्यांची व इतर संबंधिताची चौकशी करत आहोत”.
माजी प्राचार्यांची चौकशी
सीबीआयने शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रुग्णालयातील काही डॉक्टरांची, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जे घटनेच्या दिवशी रुग्णालयात हजर होते. यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चौकशीसाठी नेलं आहे. बलात्कार व खूनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना घोष यांनी भिती व्यक्त केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना एकल पीठाकडे जाण्यास सांगितलं आहे.
३डी तंत्रज्ञानाच्या मदतीने क्राईम सीन रिक्रिएट करणार
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, सीबआयने संजय रॉय याला बोलवलं आहे. सीबीआय ३डी तंत्रज्ञानाच्या मदतीने क्राईम सीन रिक्रिएट करत आहे. तसेच याच इतर डॉक्टरांची मदत घेत आहे.