Kolkata Rape Case Accused Sanjay Roy: गेल्या महिन्यात कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचारी संजय रॉयला अटक करण्यात आली असून सीबीआय या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. एकीकडे देशभरात या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत असताना आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात असताना दुसरीकडे आरोपीनं आपण हत्या केलीच नसल्याचा दावा केला आहे. पॉलिग्राफ टेस्टमध्ये गुन्हा अमान्य करणाऱ्या संजय रॉयनं आता त्याच्या वकिलाकडेही आपण निर्दोष असल्याचाच दावा केला आहे.
कविता सरकार या संजय रॉयच्या बाजूने खटला लढवत आहेत. पॉलिग्राफ चाचणीनंतर संजय रॉयनं कविता सरकार यांच्याशी बोलताना या प्रकरणी आपल्याला फसवलं जात असल्याचा दावा केला. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, संजय रॉयनं पॉलिग्राफ चाचणीदरम्यानदेखील आपण निर्दोष असल्याचाच कित्ता गिरवला होता.
प्रेसिडेन्सी जेलमध्ये संजय रॉय वकिलांना भेटला
संजय रॉयची प्रेसिडेन्सी जेलमध्ये त्याच्या वकील कविता सरकार यांच्याशी भेट झाली. यावेळी झालेल्या संवादात संजय रॉयनं तो निर्दोश असून त्याला अडकवलं जात असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला.
“मी खोलीत गेलो तेव्हा…”
दरम्यान, संजय रॉयच्या पॉलिग्राफ चाचणीवेळी काय घडलं, याबाबत टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. “मी जेव्हा सेमिनार रूममध्ये गेलो, तेव्हा तिथे डॉक्टर महिला बेशुद्धावस्थेत होती. आसपास रक्त होतं. मी त्या महिलेला ओळखतही नव्हतो”, असं रॉयनं त्याच्या वकिलांनाही सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. जेव्हा पोलिसांनी रॉयला विचारलं की पीडितेची ही अवस्था पाहून पोलिसांना का नाही कळवलं? तेव्हा रॉयनं आपण घाबरल्यामुळे तिथून पळून आलो, असं उत्तर दिलं.

संजय रॉयचं प्रेसिडेन्सी जेलमधील वर्तन…
दरम्यान, संजय रॉयच्या प्रेसिडेन्सी जेलमधील वर्तनाबाबतही या वृत्तात तरुंगातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने माहिती देण्यात आली आहे. ‘संजय रॉय फारसा कुणाशी बोलत नाही. पण त्याचं एकंदरीत वागणं घाबरलेल्या अवस्थेतलं आहे. तो घाबरूनच बोलत असतो’, असं यात म्हटलं आहे.