कोलकाता : डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, खंडपीठाने केलेली टिप्पणी आणि आंदोलक डॉक्टरांना कामावर परतण्याचे दिलेले निर्देश यानंतर तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा वाद अधिक तीव्र झाला. तृणमूलने खंडपीठाच्या निर्देशाचे स्वागत केले, तसेच या प्रकरणी केंद्र सरकार कारस्थान रचत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गलिच्छ चेहरा उघड झाला आहे असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी राज्यात उमटलेल्या जनक्षोभाच्या आडून भाजप कारस्थान रचत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. काही डावे पक्षही भाजपला सामील असल्याचा दावाही त्यांनी केला. सचिवालयात प्रशासकीय आढावा बैठकीमध्ये बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, आपण कधीही मृत डॉक्टरांच्या पालकांना पैसे देऊ केले नाहीत. पीडित कुटुंबाने नुकसानभरपाई स्वीकारावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांच्याविरोधात केला जात आहे. तो त्यांनी फेटाळून लावला.

हेही वाचा >>> मणिपूरमध्ये पंतप्रधानांचे अपयश निंदनीय; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

पश्चिम बंगालमधील सर्वात महत्त्वाचा सण असलेली दुर्गापूजा जवळ येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निदर्शने थांबवून सण साजरे करावेत असे आवाहन बॅनर्जी यांनी केले. ‘‘जर तुम्ही दररोज रात्री रस्त्यावर राहिलात तर ध्वनिप्रदूषणामुळे वृद्धांना त्रास होतो, एक महिना होऊन गेला आहे. मी तुम्हाला सण साजरे करण्याची विनंती करते आणि सीबीआयने लवकरात लवकर तपास पूर्ण करावा अशी विनंती करते’’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला (डॉक्टरांना) कामावर परत येण्याची विनंती केली आहे. जर तुम्हाला काहीही म्हणायचे असेल तर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पाच ते १० जणांचे पथक तयार करून मला भेटू शकता. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

सर्वोच्च न्यायालयाने मर्मभेदक टिप्पणी केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा गलिच्छ चेहरा उघड झाला आहे. बॅनर्जी खोटे बोलतात, . त्यांच्या सांगण्यावरूनच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आले. – गौरव भाटिया, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप