कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी देशभरात निर्देशनेही केली जात आहेत. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेतली असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आहे. यावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असल्याची माहिती आहे.
”पहाटे ३ ते ५ या कालावधीत झाला बलात्कार”
दरम्यान, पोलीस तपासानुसार पहाटे ३ ते ५ या कालावधीत डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली. आहे. पोस्टमॉर्टेमच्या अहवालानुसार तिचा शारिरीक आणि लैंगिक छळही करण्यात आला. तिच्या चष्म्याच्या काचा फुटून तिच्या डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. अशात आता पोलीस आणि सीबीआयकडून डायरीतले तपशील शोधले जात आहेत.
प्रकरण सीबीआयकडे हस्तांतर
महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतर करण्यात आलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आतापर्यंत ३० संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये काही डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचीही चौकशी केली आहे. बलात्कार व खूनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना घोष यांनी भिती व्यक्त केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना एकल पीठाकडे जाण्यास सांगितलं होतं.
पीडितेच्या आईने दिली प्रतिक्रिया
याप्रकरणावर पीडित डॉक्टरच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. तरुणीवर कामाचा प्रचंड दबाव होता असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. तसेच मुलीवरील बलात्कार व हत्येमागे रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर व इंटर्न्सवर (प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी) असू शकतात, अशा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd