Kolkata Doctors Strike : कोलकाता या ठिकाणी ९ ऑगस्टला एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. यानंतर ज्युनियर डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांनी संप पुकारला होता. संप मागच्या ४१ दिवसांपासून सुरु होता आता तो मागे घेण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून सगळे डॉक्टर कामावर परतणार आहेत. दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली. त्यांनंतर काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी संप ( Kolkata Doctors Strike ) मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. २० सप्टेंबरला संप जाहीरपणे मागे घेतला जाईल आणि २१ सप्टेंबरपासून डॉक्टर कामावर परततील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाता येथील भीषण घटना देशभरात चर्चेत राहिली

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयातल्या डॉक्टरवर संजय रॉयने बलात्कार केला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली. एवढंच नाही तर आर.जी. कर रुग्णालयाचा काळा इतिहासही या घटनेने समोर आणला. पीडितेच्या आई वडिलांनीही ममता सरकारवर आरोप केले. त्यामुळे या रुग्णालयात घडलेली घटना, त्यानंतर बाहेर येणारे अनेक तपशील तसंच सहकारी डॉक्टरांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी यामुळे काय काय घडलं? त्याची चर्चा झाली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध नोंदवत आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ज्युनियर डॉक्टरांनी संप Kolkata Doctors Strike ) पुकारला होता. हा संप अखेर ४१ दिवसांनी मागे घेण्यात आला. पश्चिम बंगालचं ममता बॅनर्जी सरकार आणि आंदोलक डॉक्टर यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. सगळ्या डॉक्टरांनी २१ सप्टेंबरपासून कामावर परतण्याचं ( Kolkata Doctors Strike ) आश्वासन दिलं आहे. या दरम्यान आपात्कालीन सेवा सुरु राहतील तर ओपीडी सेवा बंद राहणार आहेत.

हे पण वाचा- Kolkata Case : “महिला डॉक्टरांनी नाईट ड्युटी करु नये हे कसं म्हणता? तुम्ही…”, सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारला सुनावलं

ममता सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य

ममता सरकारने या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. कोलकाता येथील आरोग्य मंत्रालयाच्या मुख्यालयासमोर २० सप्टेंबरला संप ( Kolkata Doctors Strike ) जाहीरपणे मागे घेतला जाईल. त्यानंतर एक मोर्चा काढला जाईल आणि २१ सप्टेंबरपासून डॉक्टर कामावर रुजू होतील.

आंदोलक डॉक्टर अकीब काय म्हणाले?

आंदोलन काळात ज्युनिअर डॉक्टर्स फ्रंटने अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त, डीएमई आणि डीएचएस यांना राजीनामा द्यायला आम्ही प्रवृत्त केलं. आम्ही संप मागे घेतला याचा अर्थ आमचं आंदोलन संपलेलं नाही. आम्ही नव्या पद्धतीने आंदोलन पुढे घेऊन जाऊ. २१ सप्टेंबरपासून आम्ही रुग्णालयात कामावर परतणार आहोत. काम सुरु केल्यानंतर प्रशासनावर आमचं लक्ष असणार आहे, आम्हाला काहीही चुकीचं वाटलं तर आम्ही पुन्हा एका ताकदीने मैदानात उतरणार आहोत असा इशाराही यावेळी डॉ. अकीब यांनी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata doctors strike called off after 41 days what doctors said scj