पश्चिम बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा हल्ला अतिशय निंदनीय असून राज्य सरकारला असे हल्ले थांबवावे लागतील. यानंतर राज्यपालांनी गृह सचिव आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास बजावले. सीव्ही आनंद बोस म्हणाले, “जर सरकार आपल्या मूलभूत कर्तव्यापासून परावृत्त होत असेल तर संविधान आपले काम करेल. पश्चिम बंगाल बनाना रिपब्लिक नाही. राज्य सरकारने लोकशाहीमधील रानटीपणा आणि गुंडगिरी थांबवायला हवी.”
सदर घटनेवर संताप व्यक्त करताना राज्यपाल म्हणाले, “ही एक भयंकर घटना असून चिंताजनक आणि खेदजनक अशी आहे. लोकशाहीत जर रानटीपणा आणि विध्वंसक वृत्ती फोफावत असेल तर त्याला आळा घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे. जर सरकार आपल्या मूलभूत कर्तव्यात कसूर करत असेल तर संविधान आपला मार्ग स्वीकारेल. यानंतर योग्य ती कारवाई करण्यासाठी माझ्याकडे असलेले सर्व घटनात्मक पर्याय खुले आहेत. निवडणुकीपूर्वी होणारा हिंसाचार ताबडतोब संपायला हवा.”
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेशन वितरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहाँ यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातच ईडीच्या पथकावर हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. शाहजहाँच्या समर्थकांनी ही तोडफोड केली असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीचे अधिकारी सकाळी शेख यांच्या निवासस्थानी जायला निघाले होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ईडीच्या आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्याला घेरले. यावेळी त्यांनी ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत वाहनांवर हल्ला केला. ईडीच्या पथकाने निघून जावे, यासाठी गर्दीने दबाव टाकला होता.
हल्ला झाल्यानंतर ईडीच्या पथकाने आपली वाहने तिथेच सोडून मिळेल त्या मार्गाने तिथून पळ काढला. ईडीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, असा हल्ला होणे, आम्हाला अपेक्षित नव्हते. आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. केंद्रीय सुरक्षा दलावरही यावेळी हल्ला झाला.