Crime News : यूट्यूबवरील शॉर्ट्समुळे एका गुन्ह्याची उकल झाल्याचा प्रकार पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे समोर आला आहे. संबंधित महिलेने हा व्हिडीओ पाहिला नसता तर ही चोरी कधीच उघडकीस आली नसती. याबरोबरच कोलकाता शहरातील बेहला भागात राहाणाऱ्या कुटुंबाला त्यांनी घरात ठेवलेले दागिने कुठे आणि कधी गायब झाले याबद्दल कधीच कळू शकले नसते.
दरम्यान या व्हिडीओमधील पुराव्यांच्या आधारे पर्णश्री पोलिसांनी या कुटुंबाकडे पूर्वी घरकाम करणाऱ्या पौर्णिमा मोंडल (३५) या महिलेला अटक केली आहे. चोरी झाल्याच्या घटनेनंतर जवळपास सहा महिन्यांनी तिच्याकडून तीन सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
युनिक पार्क येथे राहणार्या उद्योजिका संचित्रा मुखर्जी यांनी तीन वर्षांपूर्वी मोंडल या महिलेला घरकाम करण्यासाठी कामावर ठेवले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोंडल या महिलेने अचानक काम सोडले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर नुकतेच मुखर्जी आणि त्यांचे पती समिरान यांच्या लक्षात आले की त्यांच्या घरातील काही दागिने गायब झाले आहेत.
“मोंडल ही युट्यूबवर सतत नवीन रील्स म्हणजेच शॉर्ट्स अपलोड करायची. ती रस्त्यावरही डान्स करयची आणि ते पोस्ट करायची. पण ती शिकलेली नसल्याने कमेंट सेक्शनमधील कमेंट वाचू शकत नव्हती आणि त्यासाठी अनेकदा माझी मदत घ्यायची. मी असाच एक शॉर्ट व्हिडिओ बघत असताना माझ्या लक्षात आलं की तिने माझे दागिने घातले आहेत,” असे मुखर्जी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
“माझे दोन सोन्याचे कानातले ऑक्टोबर २०२४ पासून घरातून हरवले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला आढळून आलं की मोंडलने माझे सोन्याचे कानातले घालून अनेक युट्यूब शॉर्ट्स व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मी माझ्या मोबाईलमध्ये हे व्हिडीओ सेव्ह केले. मला संशय आहे की माझ्या घरात काम करत असताना तिने माझे दोन कानातले चोरले असावेत,” असे मुखर्जी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी छापा टाकला अन्
दरम्यान मिळालेल्या तक्रारीनंतर पर्णश्री पोलिसांनी मोंडलच्या घरावर छापा टाकला आणि मुखर्जी यांचे फक्त दोनच कानातले नाही तर त्यांच्या पतीची एक आंगठी देखील जप्त केली. “आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि मोंडल ज्या घरात काम करत होती त्या इतर घरांमधून चोरीला गेलेल्या वस्तू सापडतील अशी अपेक्षा आहे,” असे एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने सांगितले.