पती-पत्नीत एखाद्या कारणावरून भांडण झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पत्नीचा की अवैध संबंध असल्यानं संतापलेल्या नवऱ्याने मारहाण केली किंवा मारण्यासाठी सुपारी दिली, अशा अनेक घटना आपल्या वाचण्यात किंवा ऐकण्यात येतात. अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला नेमल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु या घटनेचं कारण वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोलकाता येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला पत्नीची हत्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर नेमल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे तिने त्याच्या परवानगीशिवाय स्मार्टफोन विकत घेतला होता.
नरेंद्रपूर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीला स्मार्टफोन विकत घेण्यास सांगितले होते, पण त्याला त्याने नकार दिला होता. ट्युशन क्लासेस घेऊन पैसे कमावणाऱ्या महिलेने १ जानेवारीला स्मार्टफोन खरेदी केला. पतीला हे कळताच तो संतापला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान गुरुवारी रात्री तिचा पती घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावण्यासाठी गेला होता. मात्र, तो आपल्या खोलीत परतला नाही. त्यामुळे महिला शोधायला गेली आणि दोन मुलांनी तिच्यावर हल्ला केला.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेली महिला घरात पळून गेली आणि तिने अलार्म वाजवला. महिलेचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी एका हल्लेखोराला आणि पतीला पकडले. मात्र, दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. दरम्यान, आरोपींनी धारदार शस्त्राने जखमी केल्याने महिलेच्या घशाला जखम झाली असून तिला सात टाके पडले. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा कोलकात्याच्या दक्षिणेकडील नरेंद्रपूर येथे घडली.
राजेश झा असे पतीचे नाव असून, सापडलेल्या हल्लेखोराचे नाव सुरजित असे आहे. तर, पळून गेलेल्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत.