देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा असलेल्या कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. भारतात पहिल्यांदाच एखादी मेट्रो नदीखालून धावली आहे. मेट्रोची हा ट्रायल रन हावडा ते कोलकातामधील एस्प्लेनेडपर्यंत होती. मेट्रोने हुगळी नदीखाली आपला प्रवास केला. कोलकाता मेट्रोचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी यांनी मेट्रोची ही कामगिरी कोलकाता शहरासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले.
उदय कुमार रेड्डी म्हणाले की, हुगळी नदीखालून ट्रेन धावल्याची ही पहिलीच वेळ आहे. ३३ मीटर खाली हे सर्वात खोल स्टेशन देखील आहे. भारतात पहिल्यांदाच असं घडलं आहे. कोलकाता शहरासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. हावडा मैदान ते एस्प्लेनेड अशी चाचणी पुढचे ७ महिने सुरू राहील. त्यानंतर ही मेट्रो लोकांसाठी नियमितपणे सुरू केली जाईल.
हे ही वाचा >> “…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”
लवकरच हावडा-एस्प्लेनेड मार्गावर व्यावसायिक मेट्रो सेवा सुरू केल्या जातील. मेट्रोने ४५ सेकंदात हुगळी नदीच्या खाली ५२० मीटरपर्यंतचं अंतर पार केलं. नदीच्या पात्रापासून खाली ३२ मीटर खोलवर हा भूयारी रेल्वेमार्ग आहे. हावडा मैदान आणि कोलकाताच्या आयटी हब सॉल्ट लेकमधील सेक्टर व्ही (V) ला जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोरचा हा एक भाग आहे. हा प्रकल्प कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील एस्प्लेनेड स्टेशनला हावडा आणि सियालदह येथील भारतीय रेल्वे स्थानकांसोबत जोडेल.