हवामान बदलांमुळे अनेक देशांना अनिष्ट आर्थिक परिणामांबाबत टोकाची जोखीम पत्करावी लागणार असून इ.स. २०२५ पर्यंत हे परिणाम दिसून येतील, असे एका नवीन संशोधनात म्हटले आहे. कोलकाता व मुंबई या भारतातील शहरांना हवामान बदलांचा सर्वात मोठा आर्थिक फटका बसणार आहे. हे वाईट आर्थिक परिणाम आणखी तीस वर्षांमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जाणवतील, अशा धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मॅपलक्रॉफ्ट या ब्रिटनच्या जोखीम सल्लागार संस्थेने हवामान बदल व पर्यावरण जोखीम नकाशा या अहवालात असे म्हटले आहे, की धोक्याचा इशारा देण्यात आला आहे त्या देशातील जागतिक आर्थिक उत्पादनाला ३१ टक्के इतक्या प्रमाणात फटका बसणार असून इ.स. २०२५ पर्यंत होणाऱ्या हवामान बदलांचा फटका अशा प्रकारे आर्थिक आघाडीवर बसणार आहे. हवामान बदल जोखीम निर्देशांकात एकूण ६७ देशांचा समावेश करण्यात आला असून त्यातील ६७ देशांचे एकूण ४४ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके आर्थिक उत्पन्न हे हवामान बदलासारख्या भौतिक बदलांमुळे घटणार आहे. ज्या देशांवर हवामान बदलांचे वाईट परिणाम अर्थकारणावर होणार आहेत त्यात बांगलादेश क्रमांक एकवर तर गिनीया बिसाउ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिएरा लिओन (क्रमांक ३), हैती (क्रमांक ४), दक्षिण सुदान (क्रमांक ५), नायजेरिया (क्रमांक ६), काँगो (क्रमांक ७), कंबोडिया (क्रमांक ८), फिलीपीन्स (क्रमांक ९) इथिओपिया (क्रमांक १०) हे जास्त जोखीम असलेले देश आहेत. इ.स. २०२५ पर्यंत चीनचे ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न हे २८ ट्रिलियन डॉलर असेल तर भारताचे उत्पन्न ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके वाढेल. या दोन्ही देशांच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाचा एकत्रित विचार केला, तर ते जगाच्या आर्थिक उत्पन्नाच्या २३ टक्के असेल असे या अहवालात म्हटले आहे. आणखी तीस वर्षांनी कोणत्या देशांना हवामानबदलांमुळे जास्त आर्थिक जोखमी संभवते याचा विचार त्यात करण्यात आला आहे. ज्या पन्नास शहरांचा समावेश अभ्यासात होता त्यात बांगला देशातील ढाका, भारतातील मुंबई व कोलकाता, फिलिपिन्समधील मनिला, थायंलडमधील बँकॉक या शहरांना आर्थिक फटका बसणार आहे फक्त लंडन, पॅरिस यांना खूप कमी आर्थिक जोखीम असल्याचे अहवालात म्हटले आहे. पायलिन वादळामुळे अतिटोकाच्या हवामान स्थितीमुळे आर्थिक स्थितीला कसा फटका बसतो हे आपण पाहिलेच आहे ओडिशातील या वादळाने शेती व ऊर्जा क्षेत्राचे ४.१५ अब्ज डॉलर इतके नुकसान झाले आहे, असा उल्लेखही अहवालात आहे.
यात विचारात घेतलेल्या १९३ देशात भारत विसावा असून पाकिस्तान चोविसावा तर व्हिएतनामचा सव्वीसावा आहे. इंडोनेशिया जोखीम निर्देशांकात ३८ व्या स्थानावर आहे. उच्च जोखमीच्या यादीत थायलंड ४५ वा तर केनिया ५६ वा आहे, चीनचा क्रमांक ६१ वा आहे.

Story img Loader