Mamata Banarjee on Kolkata Police Band : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असा वाद पेटला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोलकाता पोलीस पथकाच्या बँडला राजभवनाच्या बाहेर उभे केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. पोलीस पथकाच्या बँन्ड ऐवजी बीएएसएफ पथकाने राजभवनात प्रदर्शन केले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपूर्वी राजभवनाने कोलकाता पोलिसांकडून परिसरातील सुरक्षा नाकारली होती. त्याऐवजी राजभवनात केंद्रीय फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पोलीस पथकाच्या बँन्डलाही राजभवनात प्रवेश नाकारण्यात आला. प्रजासत्ताक दिनी ममत बॅनर्जी दुपारी ४ च्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. यावेळी पोलिसांचं बँड गेटवर थांबल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी याबाबत विचारलं असता पोलीस आतमध्ये कार्यक्रमात सामील होऊ शकणार नसल्याचं कळलं. याप्रकरणी त्यांनी तत्काळ कॅबिनेट सहकारी आणि शहराचे महापौर फिरहाद हकीम यांच्यासमवेत थेट राजभवनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या घडामोडीची माहिती मिळताच मुख्य सचिव मनोज पंत, गृह सचिव नंदिनी चक्रवर्ती, डीजीपी राजीव कुमार आणि नबन्नामधील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

एका अधिकृत सूत्रानुसार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी त्यांना सांगितले की राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने, राजभवनकडून पोलीस दलाला दिले जात असलेल्या या वागणुकीचा त्या वैयक्तिकरित्या निषेध करत आहेत.

ममता बॅनर्जींची नेमकी भूमिका काय?

“कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यघटनेतील राज्याचा विषय आहे आणि राजभवनाच्या प्रत्येक गरजेची राज्य सरकारकडून काळजी घेतली जाते, त्यामुळे अशी वागणूक पूर्णपणे अस्वीकार्य होती”, अशी भूमिका ममता बॅनर्जींनी घेतल्याचं सूत्रांकडून समजले. टीम राजभवनने दावा केला की हे गैरसंवादातून निर्माण झालं आहे. किंवा समन्वयातील अडथळे आहेत आणि बँडला वगळण्याचा कोणताही हेतू नव्हता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बँडला राजभवनाच्या आत त्यांचा परफॉर्मन्स ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

नंतर, कार्यक्रमस्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ममता म्हणाल्या, “आम्ही इतर बँडच्या प्रदर्शनावर आक्षेप घेत नाही, परंतु कोलकाता पोलिस बँडला वगळण्याचा प्रयत्न करणे अयोग्य होते. दरवर्षी, पारंपरिकपणे, कोलकाता पोलीस बँड या कार्यक्रमात सादर करतात. यावेळी त्यांना परवानगी का देण्यात आली नाही?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata police band stopped from performing at raj bhawan on r day mamata banerjee confronts bengal governor sgk