भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांना २० जून रोजी नगरच्या नरकेलडांगा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच नुपूर शर्मांना मुंबई पोलिसांनीही या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) च्या कलम ४१ अन्वये ही नोटीस जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, कोणताही पोलीस अधिकारी, दंडाधिकार्‍यांच्या आदेशाशिवाय आणि वॉरंटशिवाय, कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकतो.

नुपूर शर्मांविरोधात एफआयआर दाखल

कोलकाता पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १५३ए, २९५ए, २९८ आणि ३४ अंतर्गत नुपूर शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात शुक्रवारच्या नमाजानंतर भारताच्या काही भागात झालेल्या हिंसक निषेधानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी पूर्व मेदिनीपूरमध्ये भाजपच्या बहिष्कृत प्रवक्त्याविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला होता.

बंगालमध्ये तीन दिवसांपासून निदर्शने
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम बंगालमधील उलबेरिया आणि पंचला, नादिया, मुर्शिदाबाद आणि हावडा येथील उत्तर २४ परगणा येथे दगडफेक आणि हिंसाचार उसळला होता. यावरून बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे. बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये संतप्त आंदोलक नुपूर शर्मांना अटक करण्याची मागणी करत आहेत.