Kolkata Rape and Murder : कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी ९ ऑगस्टला एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुणा होत्या, तसंच रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर झाला होता. संपूर्ण हादरवणाऱ्या घटनेनंतर कोलकाता ( Kolkata Rape and Murder ) येथील रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन सुरु केलं. जे अद्यापही थांबलेलं नाही. मात्र आंदोलक डॉक्टर आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात दोन तास बैठक पार पडली. या बैठकीत ममता बॅनर्जींनी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
काय घडलं बैठकीत?
कोलकाता येथील डॉक्टरांच्या आंदोलनामधून तोडगा काढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं. कालीघाट या ठिकाणी ममता बॅनर्जींचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी आंदोलनकर्ते डॉक्टर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांनी सरकारपुढे त्यांच्या मागण्या मांडल्या. तर ममता बॅनर्जींनी सगळ्या डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याची आणि कामावर परतण्याची विनंती केली.
३० आंदोलकांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट
साधारण ३० आंदोलक डॉक्टर संध्याकाळी ममता बॅनर्जींच्या शासकीय निवासस्थानी पोहचले. दोन ते अडीच तास चाललेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासह बैठकीतले मुद्दे काय चर्चिले गेले याची नोंद ठेवण्यासाठी दोन स्टेनोग्राफरही बरोबर घेतले होते. आम्ही सरकारपुढे पाच मागण्या ठेवल्या आहेत. जर त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या नेमक्या काय?
१) डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला, त्यानंतर तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. या प्रकरणाचे पुरावे ज्यांनी नष्ट केले, त्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे.
२) आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी ही दुसरी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली.
३) कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल आणि आरोग्य सचिव नारायण स्वरुप निगम यांचा राजीनामा घेतला जावा
४) आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, महिला, डॉक्टर यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करावी आणि धमकी संस्कृती संपवावी
५) मुख्य आरोपी संजय रॉय याला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी.

या मागण्या आंदोलक डॉक्टरांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेपासून या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. तसंच त्यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या पण त्यातून काही मार्ग निघू शकलेला नाही. आज ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा या आंदोलक डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र त्याबाबतचा निर्णय होणं अद्याप बाकी आहे.