Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कर आणि हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आरजी. कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरी सीबीआयने झडती घेतली. तसंच, इतर १५ ठिकाणीही झडती घेण्यात आली. तपास एजन्सीने कोलकाता रुग्णालयात आर्थिक अनियमिततेचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी केला असून त्यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल होती. या याचिकेतील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानुसार ही झडती घेण्यात आली.
एकच यंत्रणा सर्व चौकशी करणार
उच्च न्यायालयाने यापूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि आता भ्रष्टाचाराचा तपासही सीबीआयकडे वर्ग केला आहे. “या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावा, असे निर्देश या न्यायालयाने दिले आहेत, कारण या प्रकरणात गंभीर आरोप आहेत आणि प्रकरणाचे विविध पैलू हाताळणाऱ्या अनेक एजन्सीमुळे सर्वसमावेशक न्यायासाठी अकार्यक्षमता किंवा विसंगती, न्यायालयीन प्रक्रियेत अनावश्यक विलंब आणि संभाव्य चुकीचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे तपास वेगवेगळ्या एजन्सींमध्ये खंडित केला जाऊ नये, असे न्यायमूर्ती राजर्षी भारद्वाज यांनी आपल्या आदेशात नमूद केले.
हेही वाचा >> Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
संदीप घोष यांची पॉलीग्राफ चाचणीही झाली
उच्च न्यायालयाने सीबीआयला तीन आठवड्यांत तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी कोलकाता येथील सीबीआयच्या कार्यालयात संदीप घोष आणि इतर चार जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतील पॉलीग्राफ तज्ज्ञांच्या टीमला चाचण्या करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
तसंच, कोलकाता पोलिसातील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला बलात्कार-हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. सीबीआय आज त्यांची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे.
डॉक्टरांचे आंदोलन राहणार सुरूच
दरम्यान, शनिवारी आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या प्रतिनिधींमध्ये स्वतंत्र चर्चा झाली. आंदोलक डॉक्टरांनी पश्चिम बंगालमधील रुग्णालये आणि महाविद्यालयांमध्ये पुन्हा काम सुरू करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासन त्यांच्या मागण्यांवर ठोस आश्वासन देण्यात अपयशी ठरल्याने डॉक्टरांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. जॉइंट फोरम ऑफ डॉक्टर्सचे नेते मानस गुमटा म्हणाले, “फक्त चर्चा झाली, पण आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd