Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ.संदीप घोष यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबाबत भाजपाने आता मोठा दावा केला आहे. ९ ऑगस्ट रोजी बलात्कार आणि हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतरही १० ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले होते. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी यासंदर्भातील एक्स पोस्ट केली आहे.

अमित मालवीय म्हणाले, “सध्या अटकेत असलेले आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी १० ऑगस्ट रोजी सेमिनार रुमजवळील शौचालयाची दुरूस्ती आणि नुतनीकरण करण्याचे आदेश दिले होते. संदीप घोष यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, आर. जी. कर रुग्णालयाच्या सर्व विभागांमध्ये स्वतंत्र संलग्न शौचालयांसह ऑन ड्युटी डॉक्टरांच्या खोल्यांची दुरुस्ती, नुतनीकरण आणि पुनर्बांधणी तातडीने करावी.”

हेही वाचा >> Kolkata Doctor Case : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “आम्हाला पैशांची ऑफर दिली, पण…”

३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करण्यात आला होता. तसंच, तिची हत्याही करण्यात आली. तिचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी सापडला. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून संजय रॉय याला अटक करण्यात आली आहे. तो कोलकाता पोलिसांचा स्वयंसेवक म्हणून काम करत होता.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील पश्चिम बंगाल सरकार आणि हॉस्पिटलवर आरोप करत अमित मालविय म्हणाले, याचा अर्थ गुन्ह्याच्या तारखेपूर्वी सुरू झालेला नुतनीकरणाचा दावा पूर्णपणे खोटा आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि रुग्णालय खोटे बोलले आहे. कोलकाता पोलीस यांनी तुटलेल्या भिंतीचा व्हिडिओ शेअर केला, त्यांच्याविरोधात तक्रारीही केल्या आहेत.” अमित मालविय यांनी दावा केला की रुग्णालय प्रशासन आणि बंगालच्या मुख्यमंत्र्‍यांनी संगनमताने सर्व पुरावे नष्ट केले आणि गुन्ह्याचे ठिकाणही स्वच्छ केले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल हे पदाचा राजीनामा देत नाहीत तोवर या प्रकरणी योग्य तपासणी होणार आहे. बऱ्यापैकी अनेक पुरावे नष्ट कऱण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले.