Kolkata RG Kar Doctor Case : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली होती. या घटनेचा तपास आता सीबीआय करत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी कोलकाता न्यायालयात सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या जामिनासंदर्भात सुनावणी शुक्रवारी होती. मात्र, या सुनावणीला विलंब झाला. सुनावणीसाठी सीबीआयचे तपास अधिकारी आणि वकील वेळेवर हजर झाले नाही. त्यामुळे कोलकाता न्यायालयाने ‘संजय रॉयला जामीन द्यायचा का?’, असा सवाल करत सीबीआयला खडेबोल सुनावले. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Manipur Drone Attack : मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

नेमकं काय घडलं?

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या जामिनासंदर्भात न्यायालयात सुनावणी होती. यावेळी सुनावणीसाठी या प्रकरणातील तपास अधिकारी आणि वकील वेळेवर हजर झाले नाही. सायंकाळी ४.२० वाजता कामकाज सुरू होताच बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. पण यावेळी सीबीआयचे वकील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. हे न्यायाधीशांच्या लक्षात आले. त्यानंतर थोडा वेळ सीबीआयच्या वकिलांची वाट पाहिली पण तरीही ते आले नाही. त्यानंतर सीबीआयचे वकील तब्बल ४० मिनिटे उशिराने न्यायालयात पोहोचले. यानंतर न्यायाधीश पामेला गुप्ता संतप्त झाल्या आणि ‘त्याला (संजय रॉयला) जामीन द्यायचा का?’ असा सवाल करत त्यांनी सीबीआयला फटकारलं. तसेच “सीबीआयचा हा हलगर्जीपणा असून हे अत्यंत दुर्दैवी आहे”, असंही न्यायाधीशांनी म्हटलं.

पीडितेच्या आई-वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप?

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर घटनेनंतर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, “पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत पोलीस ठाण्यात आम्हाला थांबावं लागलं होतं. मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला, त्यावेळी आम्हाला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पैशांची ऑफर दिली होती, पण आम्ही लगेच नाकारली.”

नेमकी घटना काय घडली होती?

कोलकाता येथील आर.जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला गेला. या घटनेवरुन देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata rg kar doctor case calcutta court expressed displeasure with cbi for not being present during the hearing gkt