Kolkata Court RG Kar Doctor Case Verdict: मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोलकाताच्या आर. जी. कर महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी सियालदह सत्र न्यायालयाने आज मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरविले. आता सोमवारी (दि. २० जानेवारी) संजय रॉयला काय शिक्षा मिळते, याची घोषणा केली जाईल. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर ५७ दिवसांनी निर्णय सुनावला आहे. यावेळी दास यांनी संजय रॉयला दोषी ठरविताना सांगितले की, तुला शिक्षा मिळायलाच हवी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकातामध्ये सदर घटना घडल्यानंतर देशभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. कोलकाता पोलिसांचा नागरी स्वंयसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉयने गुन्हा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. आज सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या सर्वांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहीजे.

सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी संजय रॉयने प्रश्न विचारला की, ज्यांनी मला फसवले, त्यांना का सोडले जात आहे? यावर न्यायाधीशांनी सोमवारी त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत संजय रॉयची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. संजय रॉयचा इशारा आर. जी. कर महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप घोष यांच्याकडे होता. ज्यांना पुराव्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्यांना जामीनावर सोडण्यात आले.

८ ऑगस्ट २०२४ रोजी काय घडले?

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणारी एक महिला डॉक्टर ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा शिफ्ट संपल्यानंतर आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा कळले की, तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावर २५ जखमा होत्या. संजय रॉयनेच या डॉक्टरवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली. तसेच मृतदेहाची विटंबना केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये गेला होता आणि नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर आला हे दिसले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata rg kar doctor case verdict prime accused sanjay roy guilty for rape murder kvg