पीटाआय, कोलकाता
आर जी कर रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शनिवारी या प्रकरणी संजय रॉयला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. विशेषत: पश्चिम बंगालमधील निवासी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, नागरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक अशा सर्व थरांमधून आंदोलने केली गेली होती. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाच्या धर्तीवर कोलकात्यामधील तरुणीचा ‘अभया’ असा उल्लेख करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेच्या निषेधार्थ देशात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमधील सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी अनेक दिवस संप केला होता. पीडितेला न्याय मिळावा आणि सरकारी रुग्णालयांमधील सुरक्षेत वाढ करावी या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. निदर्शकांची मागणी मान्य करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात आला. त्यानुसार, खटला उभा राहिल्यानंतर साधारण दोन महिन्यांनंतर आणि गुन्हा घडल्यानंतर १६२ दिवसांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला.

हेही वाचा : Rahul Gandhi : बिहारमधील जातीनिहाय सर्वेक्षण जनतेची फसवणूक, राहुल गांधी यांचा नितीशकुमार यांच्यावर आरोप

दरम्यान, संजय रॉयला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी केली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनीही या निकालाचे स्वागत केले. त्याचवेळी या प्रकरणातील ‘व्यापक कटा’चा छडा लावावा अशीही त्यांनी मागणी केली. निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.

रॉयविरोधात घोषणा दिल्या जात होत्या आणि त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली जात होती. दुसरीकडे, या प्रकरणी सातत्यपूर्ण आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांनीही सर्व दोषींना अटक करून शिक्षा होत नाही तोपर्यंत निदर्शने सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला.

निकालाला आव्हान देणार नाही

दरम्यान या निकालाला आव्हान देणार नसल्याचे आरोपी संजय रॉयच्या बहिणीने माध्यमांना सांगितले. ती म्हणाली की, ‘‘आम्ही या प्रकारामुळे हादरून गेलो आहोत. जर त्याने काही गुन्हा केला असेल तर त्याला योग्य शिक्षा मिळायला हवी. न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा आमचा विचार नाही.’’ गेल्या अनेक वर्षांपासून आपला संजयशी काहीही संपर्क नसल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा : सैफ अली खान हल्ल्यातील संशयित आरोपी छत्तीसगडमधून ताब्यात, मुंबई पोलिसांच्या मदतीने आरपीएफने कसा लावला छडा?

घटनाक्रम

● ९ ऑगस्ट २०२४ – आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

● ९ ऑगस्ट – शवविच्छेदनात बलात्कार करून हत्या केल्याचे आढळले, शरीरावर १६ बाह्य आणि नऊ अंतर्गत इजा आढळल्या

● १० ऑगस्ट – शहर पोलिसांबरोबर नागरी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या कोलकाता पोलिसांकडून संजय रॉयला अटक

● ११ ऑगस्ट – रुग्णालयाच्या अधीक्षकांची बदली

● १२ ऑगस्ट – आर जी कर वैद्याकीय महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष यांचा राजीनामा

● १३ ऑगस्ट – कलकत्ता उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला

● १४ ऑगस्ट – घटनेच्या निषेधार्थ कोलकात्यामध्ये प्रचंड मोर्चा

● १६ ऑगस्ट – संदीप घोष यांची सीबीआयकडून चौकशी

● १८ ऑगस्ट – सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:हून दखल

● २० ऑगस्ट – सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

हेही वाचा : Arvind Kejriwal : Video : अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा ‘आप’चा दावा, तर भाजपानेही केला गंभीर आरोप

● २४ ऑगस्ट – संजय रॉयसह सातजणांची लाय डिटेक्टर चाचणी

● ९ सप्टेंबर – सर्वोच्च न्यायालयाची निदर्शक डॉक्टरांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आवाहन

● ७ ऑक्टोबर – सीबीआयचे संजय रॉयविरोधात आरोपपत्र दाखल

● ४ नोव्हेंबर – रॉयविरोधात आरोप निश्चित

● ११ नोव्हेंबर – कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू, केवळ संबंधितांनाच उपस्थित राहण्याची परवानगी, ५० साक्षीदारांची तपासणी

● ९ जानेवारी – खटल्याची सुनावणी पूर्ण

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata rg kar doctor case verdict sanjay roy found guilty pressure on west bengal government css