RG Kar Medical College And Hospital : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी २० वर्षीय विद्यार्थीनी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळली, या मुलीची आई इथे डॉक्टर म्हणून काम करते. तिचे वडील, मुंबईत राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ईव्ही प्रसाद हिचा मृतदेह शुक्रवारी रात्री छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती तिच्या खोलीत एकटीच होती.
“वारंवार फोन करूनही पीडितेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर तिच्या आईने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला तेव्हा पीडिता लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले,” असे बराकपूर पोलीस आयुक्तालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान घटनासथळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ईव्ही प्रसाद ईएसआय क्वार्टर्समधील तिच्या खोलीत एकटीच होती. तिचे वडील विद्यासागर प्रसाद बँकेत काम करतात. ते मुंबईत असतात. पीडितेची आई सुमित्रा प्रसाद कामरहाटी येथील ईएसआय रुग्णालयात डॉक्टर आहे. ती तिच्या आईसोबत क्वार्टरमध्ये राहत होती. घटनेच्या रात्री ती तिच्या खोलीत एकटीच होती. तर तिची आई दुसऱ्या खोलीत होती.
शेजाऱ्यांच्या मदतीने आईने तोडले खोलीचे दार
मृत विद्यार्थिनीच्या आईला वाटले की, त्यांची मुलगी तिच्या खोलीत अभ्यास करत आहे. म्हणून त्यांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण जेव्हा ती बराच वेळ तिच्या खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा तिच्या आईला शंका आली. त्यांनी खोलीचे दार ठोठावले, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी, शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला तेव्हा मुलगी छताला लटकलेली दिसली.
मृत विद्यार्थिनीच्या पालकांनी त्यांच्या मुलीच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल काहीही भाष्य केले नाही. त्यांनी माध्यमांसमोर हात जोडून या संदर्भात बोलण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला काहीतरी आजार होता ज्यामुळे ती नैराश्यात होती.
काही महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या
काही महिन्यांपूर्वी आरजी कर मेडिकल कॉलेजच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी संजय रॉय यांना अटक केली होती. गेल्या महिन्यात सियालदाह न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.