कोलकात्यामधील गणेश टॉकीज परिसरात गुरूवारी दुपारी बांधकाम सुरू असणारा उड्डाणपूल कोसळून त्याखाली अनेकजण सापडले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गिरीश पार्क भागातील गणेश चित्रपटगृहाजवळ ही दुर्घटना घडली. पुलाचे बांधकाम सुरु असताना अचानक तो कोसळला. यावेळी पुलाखाली नागरिकांची वर्दळ होती. तसेच काही वाहनेही लावण्यात आली होती. ज्या बाराबाझार भागात हा पूल कोसळला आहे तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. सध्या याठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पुलाच्या ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक जण अडकले असण्याची शक्यता आहे. सध्या घटनास्थळी सर्वत्र लोखंड आणि काँक्रिटचे मोठे तुकडे पसरले आहेत. याशिवाय, पूल कोसळला त्यावेळी याठिकाणी असणाऱ्या इंधनाच्या टँकर्समुळे पुलाखाली आग लागल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पोलिस व स्थानिक प्रशासनाने ढिगारा हटविण्याचे काम सुरु केले असून, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पूल कोसळल्याचे कळल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रचारसभा रद्द केली असून, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी गॅसकटर आणि क्रेन मागविण्यात आले असून, त्या साह्याने दुर्घटनाग्रस्तांना सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येते आहे. या पूलाच्या बांधणीवेळी कोणतीही सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेली नव्हती, असे स्थानिकांनी सांगितले. आमच्यापर्यंत वेळेत मदतही पोहोचली नाही. कामगारांनी आणि स्थानिकांनीच बचावकार्य सुरू करून दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा