भारतात पर्यटनासाठी आलेल्या दोन कोरियन मुली उत्तर प्रदेशच्या मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठात पोहोचल्या. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या युवकांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर धर्मपरिवर्तनासाठी या देशात आला आहात का? असा आरोप लावत हंगामा केला. एवढेच नाही तर या पर्यटक मुलींसमोर युवकांनी घोषणाबाजीही सुरु केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर या मुलींची सुटका करण्यात आली आणि या मुलींना दिल्लीला पाठविण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेक लोक त्यावर मतमतांतरे व्यक्त करत आहेत.

पर्यटक मुलींसमोर युवकांचा धिंगाणा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे युवक मुलींना प्रश्न विचारताना दिसत आहेत. तुमच्यासोबत कोण आलं आहे? इथे कशासा आला आहात? असे प्रश्न विचारत असताना एक तरुण म्हणतो की, श्रीराम यांच्यापेक्षा दुसरा कोणताही देव नाही. तर आणखी एक युवक म्हणतो की, हे मिशनरीचे लोक आहेत. युवकांच्या या प्रश्नांमुळे भांबावलेल्या मुली त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न देता पुढे चालताना दिसत आहेत.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या मेरठमधील चौधरी चरण सिंह हे एक मोठे विद्यापीठ आहे. दक्षिण कोरियाच्या दोन मुली पर्यटनासाठी येथे आल्या असताना विद्यापीठाचे कॅम्पस फिरत असताना युवकांच्या टोळक्याने त्यांना घेरत घोषणाबाजी केली. या मुलींना आधी त्यांचा धर्म विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी आपला धर्म सांगितला आणि नंतर हा विषय भलतीकडेच गेला. युवकांनी चक्क धर्मप्रसाराचा आरोप लावत या मुलींना चांगलेच जेरीस आणले.

मेरठ पोलिसांनी या घटनेनंतर सांगितले की, या मुली विद्यापीठात फिरण्यासाठी आल्या होत्या. मात्र काही युवकांनी मुद्दामहून त्यांच्या धर्माचा मुद्दा पुढे करुन त्यांना त्रास दिला. तसेच याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल. या मुली धर्म प्रचार करत आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न केला गेला, जे पूर्णपणे खोटे आहे, असा निर्वाळा मेरठ पोलिसांनी दिला आहे.

या व्हिडिओनंतर अनेक लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. सिनेनिर्माते विनोद कापरी यांनी देखील एक ट्विट करत यावर कमेंट केली आहे. “हे गुंड देशाला उध्वस्त करतील”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विनोद कापरी यांनी दिली आहे. तर आणखी एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे, “असेच होत राहिले तर पर्यटक भारतात येणं बंद करतील. पर्यटकांसोबत असे झाले तर देशाचेच नाव खराब होते.”

याआधी देखील कोरियन पर्यटक मुलीची मुंबईतील खार येथे छेडछाड झाल्याचा प्रकार घडला होता. कोरियाहून मुंबईत आलेल्या युट्यूब व्लॉगर मुलीचा विनयभंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दक्षिण कोरियाहून मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या मुलीची लाईव्ह व्लॉग करत असताना खार येथे काही मुलांनी छेड काढली. तसेच तिला बळजबरीने स्वतःसोबत नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली होती.

Story img Loader