दरवर्षी हजारो इंजिनिअर आणि डॉक्टर्स घडवणाऱ्या कोटा या शहरात एक १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनिअरिंग करण्यासाठी विख्यात महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी तो जेईई या प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करताना त्याने दोन ओळींची एक चिठ्ठी लिहिलेली असून त्यावर ‘सॉरी पप्पा मी जेईईची परीक्षा पास होऊ शकत नाही’ असा संदेश त्या विद्यार्थ्याने लिहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोटा शहात जेईई आणि नीट या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्यांचे हे सत्र थांबावे म्हणून शासन स्तरावर तसेच अन्य मार्गाने वेगवेगळ्या उपायांची अंमलबजावणी केली जातेय. असे असतानाच या १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही घटना समोर आली आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला हा १६ वर्षीय विद्यार्थी मूळचा बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहे. तो जेईई या परीक्षेची तयारी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कोटा या शहरात राहात होता. मात्र गुरुवारी (७ मार्च) रात्री त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. कोटा शहरात चालू वर्षात आत्महत्या करणारा हा पाचवा मुलगा आहे.
हेही वाचा >> “आई, बाबा..मी JEE पास नाही होऊ शकत”, १८ वर्षीय मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण!
घरमालकाने फोन कॉल्स केले पण…
या विद्यार्थाने आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. घरमालकाला विद्यार्थ्याच्या खोलीतून दुर्गंधी आल्यानंत हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला घरमालकाने या मुलाला फोन कॉल केले. मात्र उत्तर न मिळाल्यामुळे दरवाजा तोडून पाहिल्यावर हा मुलगा मृतावस्थेत आढळून आला.
विषारी द्र्व्य पिऊन स्वत:ला संपवलं
कोटाचे उपअधीक्षक धर्मवीर सिंह यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली आहे. “या मुलाच्या मृतदेहाजवळ दोन ओळींची एक चिठ्ठी आढळून आलेली आहे. यावर सॉरी पप्पा, माझ्याकडून जेईई परीक्षा पास होणं शक्य होणार नाही, असे लिहिलेले आहे,” असे सिंह यांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मुलाने स्वत:ला संपवण्यासाठी विषारी द्रव्य पिले आहे. कारण या मुलाचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळला त्याच ठिकाणी काही बॉटल्स आढळल्या आहेत. तसेच घरमालकाला विषारी द्रव्याचा उग्र वासही येत होता.
हेही वाचा >>> तणावामुळे कोटा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या
दोन परीक्षांना गैरहजर
गेल्या काही दिवसांपासून हा मुलगा मानसिक तणावात होता असे म्हटले जात आहे. कारण शिकवणीमध्ये घेण्यात आलेल्या २९ जानेवारी आणि १९ फेब्रुवारी रोजीच्या दोन्ही परीक्षांना तो गैरहजर होता. या वर्षी तो इयत्ता १२ वीची परीक्षा देणार होता.
दरम्यान, मृत मुलाचे वडील हे पश्चिम बंगालमध्ये उद्योजक आहेत. तर त्याची आई आणि लहान भाऊ हे भागलपूर येथे राहतात. मृत मुलाचे कुटुंब अद्याप कोट्यात पोहोचलेले नाही. तोपर्यंत या मुलाचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे. २०२३ या साली कोटा शहरात एकूण २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.