भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज (शनिवार, २ मार्च) पत्रकार परिषद घेऊन देशातील १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून दुसऱ्यांदा आणि संरक्षणंमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून लोकसभा लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाने उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामधील एक नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनादेखील लोकभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. एके काळचे मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. भाजपात गेल्यानंतर त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापाठोपाठ आता त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

काँग्रेसमध्ये असताना कृपाशंकर यांच्याविरोधात कारवाईसाठी भाजपाचे नेते आग्रही होते. भाजपा आणि शिवसेनेने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अनेक आंदोलनंही केली होती. भाजपा नेते जवळपास दररोज कृपाशंकर यांच्याविरोधात पत्रके काढायचे. आता मात्र कृपाशंकर पक्षासाठी महत्त्वाचे नेते ठरले आहेत.

हे ही वाचा >> BJP Candidate List : भाजपाची १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार

दरम्यान, भाजपाने उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरातमधील १५, राजस्थानमधील १५, केरळमधील १२, तेलंगणामधील ९, आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीमधील ५, जम्मू काश्मीरमधील २, उत्तराखंडमधील ३, अरुणाचल प्रदेशमधील २, गोव्यातील १, त्रिपुरामधील १, अंदमान निकोबारमधील १ आणि दिव-दमणमधील एका लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kripashankar singh to contest jaunpur lok sabha election from bjp asc
Show comments