Who is Kshitij Tyagi: जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या ५८ व्या मानवाधिकार परिषदेची सातवी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारताने याला जोरदार फटकारत उत्तर दिले आहे. यावेळी भारताने पाकिस्तानचे वर्णन केवळ एक अपयशी राष्ट्र म्हणून केले नाही तर आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेला देश म्हणून देखील केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या अधिवेशनानंतर भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितिज त्यागी यांचे खूप कौतुक होत आहे. ज्यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.
कोण आहेत क्षितिज त्यागी?
क्षितिज त्यागी यांनी जिनेव्हामध्ये पाकिस्तानवर जोरदार टीका केल्यानंतर त्यांची जगभरात चर्चा होत आहे. भारतीय परराष्ट्र सेवेत येण्यापूर्वी ते अभियंता होते. त्यांनी देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याच संस्थेतून थर्मल एनर्जी आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक केले.
२०१२ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण
क्षितिज त्यागी यांनी पुढे जोन्स लँग लासेल नावाच्या रिअल इस्टेट कंपनीत व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले. एप्रिल २०१० मध्ये जेव्हा ते अक्षय ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले तेव्हा भारत सरकारशी त्यांचा संबंध सुरू झाला. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर, त्यांनी २०१२ मध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले.
क्षितिज त्यागी काय म्हणाले?
भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितिज त्यागी म्हणाले, “पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया दुटप्पी आणि अमानवी वृत्तीच्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम राहिल. मागच्या काही वर्षांत या भागातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर मोठी प्रगती झालेली आहे. भारत सरकार दहशतवाद मुक्त धोरण आखत असल्याचाच हा पुरावा आहे.”
अपयशी राष्ट्र
क्षितीज त्यागी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांद सुनावत म्हटले की, “पाकिस्तानचे नेते आणि प्रतिनिधी त्यांच्या लष्करी दहशतवाद्यांनी दिलेला खोटेपणा पसरवत आहेत हे पाहून खेद वाटतो. आंतरराष्ट्रीय मदतींवर टिकून राहणाऱ्या एका अपयशी राष्ट्राकडून या परिषदेचा वेळ वाया घालवणे दुर्दैवी आहे. त्यांच्या वक्तृत्वातून ढोंगीपणा, अमानुषतेची कृती आणि अकार्यक्षमतेचे शासन स्पष्टपणे दिसते.”