तामिळनाडूतील कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे पहिले युनिट मंगळवारी दक्षिण क्षेत्राच्या ग्रीडशी कार्यान्वित करण्यात आले असून त्यामधून १६० मेगाव्ॉट वीजनिर्मितीही करण्यात आली. त्यामुळे भारत आणि रशियातील वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे मानले जात आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला हे पहिले युनिट कार्यान्वित झाले आणि त्यामधून १६० मेगाव्ॉट वीजनिर्मिती झाली, असे प्रकल्पाचे संचालक आर. एस. सुंदर यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती ५०० मेगाव्ॉट, ७५० मेगाव्ॉट आणि एक हजार मेगाव्ॉटवर जाणार आहे.
वीजनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर विविध चाचण्या घेण्यात येणार असून तांत्रिक निकषही पडताळून पाहिले जाणार आहेत. प्रत्येक टप्प्याच्या निकालावर पुढील टप्प्यावर जाण्याचा प्रवास अवलंबून राहणार आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा रशिया दौरा मंगळवारीच संपला. त्या दिवशी प्रकल्पाचे पहिले युनिट कार्यान्वित झाले.