सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू हाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिली.
येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही नेत्यांनी वेळ काढून चर्चा केली. या वेळी कुडनकुलम प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबतचे आश्वासन पंतप्रधानांनी पुतीन यांना दिले. कुडनकुलम विभाग-१ पुढील महिन्याभरात सुरू होणार असून तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यालाही सर्व मंजुऱ्या देण्यात आल्या असून दोघांच्या सहकार्यातून तेदेखील कार्यान्वित होतील, असा विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुतीन यांना दिला.
या बैठकीला पंतप्रधानांसमवेत अर्थमंत्री पी. चिदम्बरम, वाणिज्यमंत्री आनंद शर्मा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षी जपानमधील फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेनंतर या प्रकल्पाविरोधातील वातावरण अधिक चिघळले असून सुरुवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थांनी या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आर्थिक सहकार्याबाबत बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीबाबत दोन्ही देश समाधानी नसून संबंध अधिकाधिक बळकट करण्यावर भर आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी भारतभेटीदरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या प्रेमळ स्वागताबद्दल पुतीन यांनी आभार मानले तसेच येत्या सप्टेंबरमध्ये सेंट पिटसबर्ग येथे होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग आवर्जून रशियाला येतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रशियाबरोबरचे संबंध सुदृढ करण्यावर आपला नेहमीच भर राहिला असून रशियाच्या अध्यक्षांना भेटण्याची संधी वाया घालवणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.
रशियाबरोबरचे संबंध बळकट करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना रशियाच्या सुरक्षा सल्लागाराशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगितल्याचीही माहिती सिंग यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा