इंफाळ, चुराचांदपूर : मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारादरम्यान, बहुसंख्याक मैतेई समुदायाच्या लोकांचे आदिवासी जमावापासून संरक्षण करून त्यांना काही अंतरावर असलेल्या लष्करी वाहनांमधून जाण्यासाठी मदत करण्याकरिता कुकी महिलांनी चुराचांदपूरमध्ये मानवी साखळी तयार केली.
या महिलांनी, हिंसाचारग्रस्त भागातून स्थलांतरित करण्यात येत असलेल्या मैतेई लोकांना जमावाला कुठलीही हानी पोहोचवू दिली नाही.
महिलांनी रस्त्यावर साखळी तयार केली आणि मैतेई लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून हलवण्यात येत असताना जमावाला पुढे जाऊ दिले नाही किंवा कुठल्याही प्रकारची नासधूस करू दिली नाही, असे या शहराच्या एका नागरिकाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. या घटनेचा व्हिडीओ लवकरच समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.
११,४०० लोकांची सुटका
लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी आतापर्यंत चुराचांदपूर, इंफाळ आणि मोरेह येथील हिंसाचारग्रस्त भागातून ११ हजार ४०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे, असे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.
मणिपूरमध्ये ‘नीट’ परीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी आज, रविवारी होऊ घातलेली वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) मणिपूरमध्ये तेथील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पाहता पुढे ढकलण्यात आली असल्याचे राष्ट्रीय चाचणी यंत्रणेने (एनटीए) शनिवारी जाहीर केले. ज्या उमेदवारांचे परीक्षा केंद्र मणिपूरमध्ये होते, त्यांच्यासाठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मणिपूरमधील सध्याची परिस्थिती विचारात घ्यावी आणि ही परीक्षा पुढे ढकलावी, असे पत्र केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी शनिवारी एनटीएला लिहिले होते.