हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांची सुटका होऊ शकते असे मत आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी व्यक्त केले आहे. मोहम्मद असद दुर्रानी, रॉ चे माजी प्रमुख ए एस दुलत आणि पत्रकार आदित्य सिन्हा यांनी ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात दुर्रानी यांनी एका टप्प्यावर पाकिस्तान कुलभूषण जाधव यांची सुटका करु शकतो असे म्हटले आहे.
२०१६ साली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आली. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर दहशतवादी कारवाया आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला. १० एप्रिल २०१७ रोजी पाकिस्तानी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. कुलभूषण यांना त्यांची बाजू मांडायची संधी न देता अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे भारतातून तीव्र संतापाच्या भावना व्यक्त झाल्या.
भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला जोरदार चपराक लगावत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईने पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. ‘द स्पाय क्रॉनिकल्स या पुस्तकात दुर्रानी यांनी लाल मशिदीचे ऑपरेशन फसल्याची कबुली दिली आहे तसेच ओसामा बिन लादेन कुठे आहे हे आयएसआयला ठाऊक होते. पण लादेन पाकिस्तानात हिरो असल्याने त्याला बाहेर काढायला आम्ही घाबरत होतो असे पुस्तकात म्हटले आहे.