पाकिस्तानने इस्लामाबादमधील भेटीदरम्यान कुलभूषण जाधव आणि त्यांच्या पत्नी व आई यांना मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा खुलासा केला असून सुरक्षेचे कारण पुढे करत जाधव यांच्या पत्नीचे मंगळसूत्रही पाकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी काढायला लावल्याचे समजते.
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये त्यांची पत्नी व आई यांच्याशी काचेच्या भिंतीआडून भेट झाली. त्यांचे संभाषणही इंटरकॉ़मवरुन झाले होते. या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भारतावर आरोप केले होते. कुलभूषण जाधव हा भारतीय दहशतवादाचा चेहरा होता, असा आरोप पाकने केला होता.
मंगळवारी दुपारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन पाकला प्रत्युत्तर दिले. या भेटीदरम्यान पाकने जाधव कुटुंबीयांना चांगली वागणूक दिली नाही, असे भारताने स्पष्ट केले. सुरक्षेचे कारण पुढे करत पाकने कुटुंबीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या. पाकमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या पत्नीला मंगळसूत्र, बांगड्यापासून ते अगदी टिकलीपर्यंत काढायला लावले, असा दावा अधिकाऱ्याने केला.
#WATCH MEA spokesperson Raveesh Kumar on meeting of #KulbhushanJadhav's mother and wife with Jadhav in Islamabad pic.twitter.com/O6HkKoc7WK
— ANI (@ANI) December 26, 2017
कूलभूषण जाधव यांच्या आईने मुलाशी मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जाधव या मुलाशी मातृभाषेतच बोलतील हे साहजिक होते, पण पाकने त्यावरही आक्षेप घेतला. त्यामुळे एका आईला तिच्या मुलाशी फार बोलताच आले नाही, असे त्यांनी नमूद केले.
डेप्यूटी हायकमिश्नरला या भेटीदरम्यान उपस्थित राहता आले नाही, भारताने आक्षेप घेतल्यावर डेप्यूटी हायकमिश्नरला दुसऱ्या खोलीतून ही भेट पाहता आली. भेटीदरम्यान त्यांच्यातील संभाषण किंवा कुलभूषण जाधव यांना प्रश्न विचारता आले नाही, याकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, सोमवारी जाधव यांची आई अवंती आणि पत्नी चेतना या सोमवारी सकाळी दुबईमार्गे विमानाने इस्लामाबादल्या पोहोचल्या. त्यांनी सुमारे अर्धा तास भारतीय दुतावासात घालवला. यानंतर या दोघी ‘आगा शाही ब्लॉक’ या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत गेल्या. काचेच्या भिंतीआडून कुलभूषण जाधव यांनी पत्नी आणि आईशी संवाद साधला. ही भेट सुमारे ४० मिनिटे चालली होती.