कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटू देण्याचे नाटक पाकिस्तानने सोमवारी पार पाडले. परंतु, हे नाटक देखील सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानच्या सरकारी इमारतीत न करता चक्क पार्किंग लॉटमधल्या एका शिपिंग कंटेनरमध्ये केल्याचा गौप्यस्फोट इंडिया टुडेनं केला आहे. सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेली कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीशी सोमवारी भेट झाली. पाकिस्तानने जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटू दिले नाही.

त्यामुळे जाधव यांना कुटुंबियांना तब्बल २२ महिन्यांनी भेटता आले इतकीच काय ती दिलासादायक बाब. ती भेटही बंद खोलीत करण्याचा मोठेपणा पाकिस्तानने दाखवला नाही, आणि काचेच्या पलीकडे केवळ एकमेकांना दर्शनाचा लाभ घेता आला. ज्यावेळी या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये आले त्यावेळी जाधव यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे जाणवत होते. त्यांचे हाल करण्यात आल्याचे मानण्यास पुरेशी जागा आहे.

ही भेटही पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये किंवा जहाजावर असतात त्या भल्या मोठ्या कंटेनरमध्ये घडवण्यात आली आणि सरकारी इमारतीमधल्या खोलीमध्ये भेट घडवल्याचा आव आणण्यात आला. इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार हा कंटेनर तीन भागात विभागला होता. साउंड प्रूप अशी भिंत मध्ये उभारण्यात आली होती. जाधव व त्यांच्या आई व पत्नी यांनी स्पीकरच्या माध्यमातून संवाद साधला.

असं समजतं की जाधव यांच्या आईनं अवंती जाधव यांनी मुलासाठी भेटवस्तू आणली होती, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ती भेटवस्तू कुलभूषण यांना दिली नाही. पाकिस्तानी पत्रकारांना अवंती जाधव व चेतनकूल जाधव यांच्याशी बोलण्याची इच्छा होती परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अवंती जाधव यांची पत्रकारांशी गाठच पडू दिली नाही.

Story img Loader