अमेठीत मेळावा घेऊन राहुल गांधींना आव्हान देण्याच्या प्रयत्नात असलेले आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास यांना रविवारी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. कुमार विश्वास आणि त्यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीवर अंडी व शाईदेखील फेकल्याचे समजते.
अमेठीत रविवारी आम आदमी पक्षाचे वाचाळवीर नेते कुमार विश्वास हे जनविश्वास रॅली घेणार आहेत. या रॅलीसाठी अमेठीत रवाना झालेल्या कुमार विश्वास यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. जगदीशपूर, अमेठी अशा विविध ठिकाणी संतप्त नागरिकांनी कुमार विश्वास यांना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला. काही ठिकाणी आंदोलकांनी गाड्यांच्या ताफ्यावरही दगडफेक, अंडी व शाई फेकून रोष व्यक्त केला. मात्र अंडी व गुंड पाठवून विरोधकांना घाबरावायचे ही भाजप व काँग्रेसची जुनी रणनिती असून त्याला आम्ही घाबरणार नाही असे कुमार विश्वास यांनी सांगितले.
कुमार विश्वास अमेठीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्‍यात येणार आहे. गेल्या बुधवारी अमेठीतील जागेसाठी कुमार विश्वास यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे कुमार यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे. तसेच, ते १६ जानेवारीपर्यंत अमेठीत थांबणार आहेत. ‘आप’च्या सूत्रांनुसार, कुमार विश्वास निवडणुकीपर्यंत जास्तीत जास्त काळ अमेठीत राहणार आहे.

Story img Loader