‘आम आदमी पक्षा’त (आप) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गृहकलहावर तूर्तास पडदा पडला आहे. पक्षावर नाराज असलेले कुमार विश्वास ‘आप’मध्ये राहणार किंवा नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, ‘आप’ला कुमार विश्वास यांची समजूत काढण्यात यश आले आहे. तर विश्वास यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या अमानतुल्लाह खान यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आपने कुमार विश्वास यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याकडे राजस्थानचे प्रभारीपद सोपवले आहे. राजस्थानमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणूक होते आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने कुमार यांच्याकडे प्रभारीपद सोपवून त्यांच्यावर एकप्रकारे विश्वास दाखवला आहे. कुमार विश्वास यांनी आज ‘आप’च्या संसदीय समितीसह दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. ही बैठक संपल्यानंतर कुमार विश्वास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या पाठी उभे राहणाऱ्या समर्थकांचे आभार मानले.
शाझिया इल्मींकडून फिट्टमफाट!, कुमार विश्वास यांच्या जुन्या ट्विटवर पलटवार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी रात्री पक्षाचे नेते कुमार विश्वास यांची काल रात्री भेट घेतली होती. यानंतर पक्षात सारे काही आलबेल असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला होता. कुमार विश्वास चळवळीचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यांच्या मनात पक्षातील काही मुद्यांबद्दल नाराजी आहे. मात्र आम्ही त्यांची समजूत काढू, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, कुमार विश्वास यांनी पक्षात राहण्यासाठी केजरीवाल यांच्यासमोर तीन अटी ठेवल्याचीही चर्चा होती. या अटी मान्य झाल्या तरच आपण पक्षात राहू, अशा इशारा विश्वास यांनी दिला होते. आजच्या बैठकीत कुमार विश्वास या अटी पक्षासमोर ठेवणार होते. मात्र, या अटी पक्षाकडून मान्य करण्यात आल्या किंवा नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पक्षाच्या चुकांवर गप्प बसणार नाही; कुमार विश्वास यांनी केजरीवालांना सुनावले