Prayagraj Kumbh Mela 2019 : कुंभ महोत्सव दर चवथ्या वर्षी नाशिक, इलाहाबाद, उज्जैन, आणि हरिद्वारमध्ये साजरा करण्यात येतो. यावेळेस मकरसंक्रातीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिले शाही स्नान पार पडले आहे. साधू-संतांसह अनेक भाविकांना शाही स्नान केले. आजच्या दिवशी गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष प्राप्ती होते, अशी भाविकांची धारणा आहे.
कुंभ मेळा म्हणजे गर्दीचा महापूर असतो. लाखो भाविक येथे उपस्थिती दर्शवतात. स्वच्छतेची काळजी म्हणून भाजपा सरकारने एक लाख २२ हजार स्वच्छतागृहाची सोय केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ उपक्रमासाठीही कुंभ मेळ्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ’ असे घोषवाक्यच यंदाच्या कुंभ मेळ्यासाठी तयार करण्यात आले आहे.
आजपासून (सोमवार) सुरवात झालेल्या कुंभ मेळ्याची समाप्ती चार मार्च रोजी होणार आहे. यास देशविदेशातून लाखो भाविक येत असतात. या सर्वांच्या सोयीसाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. ही सर्व गर्दी पाहाता एक लाख २२ हजार लाख स्वच्छतागृहे उभारली आहेत.
दरम्यान, यंदा कुंभमेळ्यात हायटेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. लोकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेचा विचार करुन संगमावर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये १०० बेड आहेत. कुंभमेळ्यात ४०००० एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यात लेझर शो सह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुंभ मेळा आयोजकांनी ठिकठिकाणी ५० ‘आरओ’ वॉटर एटीएम उभारली आहेत. तसेच, यंदाच्या मेळ्यात स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.