Prayagraj Kumbh Mela 2019: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये आजच्या मौनी आमावास्येनिमित्त दुसऱ्या शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. येथील गंगेच्या संगमावर भाविकांनी काल रात्री ११ वाजल्यापासूनच या पवित्र स्नानाला सुरुवात केली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौनी आमावास्येनिमित्त पवित्र दिनी स्थानिक नागरिकांना तसेच शाही स्नानासाठी आलेल्या देश-विदेशातील भाविकांना आणि संत-महात्म्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आजवर या कुंभमेळ्यामध्ये साडेसात कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

आजचे मौनी आमावास्येनिमित्त होणारे दुसरे शाही स्नान तेरा आखाड्यांकडून शाही स्नान केले जाणार आहे. हे आखाडे तीन वर्गांमध्ये विभागले आहेत. यामध्ये सन्यासी, बैरागी आणि उदासीन असे तीन आखाडे आहेत. सर्वात आधी सन्यासी आखाड्याचे साधू शाही स्नान करतील त्यानंतर बैरागी आणि शेवटी उदासीन आखाड्याचे साधू येथे शाही स्नान करतात.

कुंभ महोत्सव दर चवथ्या वर्षी नाशिक, इलाहाबाद, उज्जैन, आणि हरिद्वारमध्ये साजरा करण्यात येतो. यावेळेस मकरसंक्रातीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रयाग कुंभ मेळ्याला इतर कुंभ मेळ्याच्या तुलनेत सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानण्यात येते. कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान आज १५ जानेवारीला झाले. कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रत्येक शाही स्नानाचे महत्त्व वेगवेगळे असते.

अशा आहेत शाही स्नानाच्या तारखा

१५ जानेवारी – मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान)
२१ जानेवारी सोमवार – पौष पौर्णिमा
३१ जानेवारी गुरुवार – पौष एकादशी स्नान
०४ फेब्रुवारी सोमवार – मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दुसरं शाही स्नान)
१० फेब्रुवारी रविवार – वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान)
१६ फेब्रुवारी शनिवार – माघी एकादशी
१९ फेब्रुवारी मंगळवार – माघी पौर्णिमा
४ मार्च सोमवार : महाशिवरात्री (अंतिम स्नान )