Kunal Kamra to Samay Raina know 7 major Controversies over jokes : कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याने सादर केलेल्या एका गाण्यामुळे चर्चेत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित गाणे गायल्याने वाद पेटला आहे. टोकदार राजकीय विनोदांसाठी प्रसिद्ध असलेल्या कामराने सादर केलेल्या या गाण्यावर शिवसैनिक चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर कुणाल कामरा याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, त्या ठिकाणाचीही शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. याबरोबरच कामरा याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. पण लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे विनोद केल्यामुळे एखाद्या कॉमेडियनवर टीका आणि कायदेशीर कारवाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भारतात यापूर्वीही बऱ्याचदा असे वाद समोर आले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये कामरापासून ते समय रैना पर्यंत अनेक भारतीय विनोदी कलाकारांना त्यांच्या कंटेंटसाठी टीकेला सामोरे जावे लागले आहे, इतकेच नाही तर कायदेशीर कारवाईचा देखील सामना करावा लागला आहे. राजकीय व्यक्तींवर व्यंग्यात्मक टीका असो किंवा विशीष्ट समुहाला न आवडणारे विनोद असो, हे कॉमेडियन्स बऱ्याचदा चर्चेचा विषय राहिले आहेत. भारतीय कॉमेडियन्स संबंधी आजपर्यंत झालेले सर्वात हाय-प्रोफाईल वाद कोणते होते? याबाद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहेत.

१) कुणाल कामरा

कुणाल कामरा हा त्याच्या टोकदार राजकीय विनेदांसाठी ओळखला जातो, यापूर्वी देखील त्याने केलेले विनोद वादात सापडले आहेत. यावेळी देखील कुणालने एका प्रसिद्ध गाण्याच्या विडंबन करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील कार्यकर्तांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी मुंबईतील द हॅबिटॅट कॉमेडी क्लब येथे मोडतोड केली. हा क्लब आता काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी कामराने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

२) समैय रैना आणि इंडियाज गॉट लेटंट प्रकरण

समैय रैना याच्या इंडियाज गॉट लेटंट या कार्यक्रमाच्या एका भाग व्हायरल झाला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी होऊ लागली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रनवीर हलाहबादीया याने एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला ज्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर रणवीरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद चक्क संसदेत देखील पाहायला मिळाले. ऑनलाईन कंटेंटवर निर्बंध घालण्याबाबत च्रचा सुरू झाल्या. यानंतर रैनाने या शोचे सर्व भाग इंटरनेटवरून काढून टाकले.

३) मुनव्वर फारुकीला अटक

मुनव्वर फारुकी याने २०२१ मध्ये इंदौर येथे अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हिंदू देवता आणि अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विनोद केल्याच्या आरोप ठेवण्यात आळा होता. मात्र काहींनी दावा केला की फारुकीने असा काही विनोद केलाच नव्हता. यावेळी देखील भाषण स्वातंत्र्याच्या मुद्दा पुन्हा चर्चेत आला. २०२४ मध्ये बिग बॉस १७ च्या विजेतेपदानंतर तळोजा येथील एका शोमध्ये कोकणी लोकांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे मुनव्वर याच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर येणार्‍या जहरी प्रतिक्रियांमुळे अखेर त्याला चूक मान्य करत माफी मागावी लागली होती.

४) तन्मय भट

एआयबीचा सह-संस्थापक तन्मय भट याने २०१६ मध्ये एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर सारख्या दिग्गजांची फेस फिल्टर वापरून नक्कल करणारे स्नॅपचॅट व्हिडिओ बनवले होते. यावरून तन्मय भट याच्यावर सडकून टीका करण्यात आली. अनेकांनी हा या दिग्गजांचा अपमान असल्याचे म्हटले, अनेकांनी याविरोधात कारवाईची मागणी केली. दरम्यान एआयबीने आयोजित केलेला रोस्ट इव्हेंट आणि नंतरच्या #MeToo स्कँडल यामुळे एआयबीचा शेवट झाल्याचे पाहायला मिळाले.

५) कपिल शर्मा

कपिल शर्मा हा त्याच्या क्लिन कॉमेडीसाठी ओळखला जातो, पण तोदेखील वादापासून दूर राहू शकलेला नाही. २०१६ मध्ये त्याने सरकारी नौकरी करणाऱ्या महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. नंतर त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवर याबरोबरचा वाद देखील चांगलाच चर्चेत राहिला. या वादादरम्यान त्याने शिवीगाळ केल्याचे सांगितले जाते.

६) कुणाल कामरा एअरलाइन वाद

कुणाल कामरा यापूर्वी देखील वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी २०२० साली त्याच्यावर काही विमान कंपन्यांनी बंदी घातली होती. त्याने न्यायव्यवस्थेवर टीका करणारी पोस्ट केल्याने देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

७) वीर दास ‘टू इंडियाज’ वाद

२०२१ मध्ये वीर दास याच्या वॉशिंग्टनच्या केनेडी सेंटरमध्ये दिलेल्या ‘टू इंडियाज’ या मोनोलॉगने एकच खळबळ उडवून दिली होती. दरम्यान अनेकांनी वीर दासने दाखवून दिलेल्या भारतामधील विरोधाभासांचे कौतुक केले होते, तर अनेकांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत त्याने माफी मागावी अशी मागणी करम्यात आली.