मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दोन शहरांना पवित्र शहरं म्हणून घोषित केले आहेत. या दोन शहरांमध्ये मद्य आणि मांस विक्री होणार नाही. यामध्ये जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूरसह बांदकपूरचा समावेश आहे.
झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून २८५ किमी अंतरावर असलेल्या दामोह जिल्ह्यात असलेल्या कुंडलपूरमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक उत्सवात सहभागी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले. यावेळी त्यांनी पवित्र शहरांची घोषणा केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘आचार्य विद्यासागर महाराजांच्या प्रेरणेने मी कुंडलपूर आणि बांदकपूरला पवित्र क्षेत्र म्हणून घोषित करत आहे. या दोन्ही ठिकाणी मांस आणि दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल.’ बांदकपूर शहर हे शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
चौहान म्हणाले की, “भटक्या मानवतेला आचार्य श्रींनी मार्ग दाखविला आहे. शिक्षण, आरोग्य, गोवंश सेवा या क्षेत्रात त्यांनी प्रेरणादायी कार्य केले आहे. संत विद्यासागर महाराजांसारखे महान संतही या पृथ्वीतलावर राहिले यावर येणाऱ्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. जेव्हाही मला कोणतीही अडचण येते, तेव्हा आचार्य श्रींचे स्मरण करून मला त्यावर उपाय सापडतो. मी येथे मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाहीत, तर त्यांचा शिष्य म्हणून आलो आहे. ही जागा मला स्वर्गासारखी वाटते. आचार्य श्रींचे दर्शन मला शब्दात वर्णन न करू शकण्याइतके समाधान आणि आनंद देते,” असं त्यांनी सांगितलं.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “विद्यासागर महाराज यांच्या इच्छेनुसार राज्य सरकार वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम वर्षभरात हिंदीतून सुरू करणार आहे. तसेच नागरिकांनी गायींच्या रक्षणाच्या कामात पुढे यावे आणि चांगल्या पर्यावरणासाठी झाडे लावावीत,” असे आवाहनही त्यांनी केले.