भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील काही चित्त्यांचे राज्याच्या शेवपूर जिल्ह्यातील गांधी सागर अभयारण्यात केले जाणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की २० एप्रिलला हे स्थलांतर केले जाईल. सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये १७ चित्ते मोकळ्या जंगलात असून त्यापैकी नऊ चित्ते पिंजऱ्यांमध्ये आहेत.

एक्सवर दिलेल्या माहितीमध्ये यादव यांनी सांगितले की चित्ता प्रकल्पाचा २० एप्रिलपासून गांधी सागर अभयारण्यात विस्तार केला जाईल. चित्त्यांच्या आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. किती चित्ते स्थलांतरित केले जातील याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात दोन चित्ते शेवपूर जिल्ह्यात पाठवले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांनी शुक्रवारी यादव आणि राज्यातील अधिकाऱ्यांबरोबर चित्ता प्रकल्पाचा आढावा घेतला.