Ghulam Rasool Magray Shot Dead: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असताना, दहशतवाद्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव गुलाम रसूल मगरे असे आहे.

शनिवारी रात्री उशिरा कुपवाडा जिल्ह्यातील कानी खास भागात दहशतवाद्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मगरे यांना रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांचा मृत्यू झाला. मागरे ४४ वर्षांचे होते. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

पहलगाममध्ये २६ जणांच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल काश्मीर खोऱ्याच्या सतर्क झाले आहेत. परंतु इतका कडक बंदोबस्त असूनही, दहशतवाद्यांनी ही हत्या केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. अनेक दहशतवाद्यांची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची घरे उद्धव करण्यात आली आहेत. तर आतापर्यंत २००० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे. या प्रकरणात नवीन एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, किमान चार दहशतवादी पहलगामच्या बैसरनम कुरणात एम४ कार्बाइन असॉल्ट रायफल्स आणि एके-४७ ने गोळीबार केला.

पंतप्रधान मोदींचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बा या कार्यक्रमातून दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, “भारतीय लोकांमध्ये जो राग आहे तो जगभर आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेशही पाठवले आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे.

“मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल”, असेही पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.