प्रेषित मोहम्मद यांच्या अवमानना प्रकरणाचे कुवेतमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. कुवेतमधील व्यापारी आणि नागरिकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केल्याच्या निषेधार्थ भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केलीय. अनेक मॉलमध्ये भारतीय वस्तू बाजूला काढण्यात आल्या आहेत. यात मिर्ची, मसाले, तांदूळ, चहापावडर, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
भाजपाच्या नेत्यांनी इस्लामोफोबियातून प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आखाती देशांमध्ये सौदी अरब, कतार, कुवेत आणि इतर देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. तसेच संबंधित देशांमधील भारतीय राजदूतांकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. या प्रकरणात भारताने माफी मागावी, अशीही मागणी होत आहे.
हेही वाचा : प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: नुपूर शर्मांना अटक करण्याची ओवैसींची मागणी
अनेक ठिकाणी भारतीय वस्तू वेगळ्या करून त्या प्लास्टिकने झाकल्या आहेत. तसेच त्यावर आम्ही भारतीय वस्तू दुकानातून काढून टाकल्या आहेत, अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. कुवेतमधील एका दुकान मालकाने एएफपीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “आम्ही कुवेतमधील मुस्लीम नागरिक प्रेषित मोहम्मद यांचा अपमान अजिबात सहन करणार नाही.”