L&T Clarification On Chirman Statement : लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबद्दल केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. एसएन सुब्रह्मण्यम यांनी, पत्नीकडे पाहत बसण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असे म्हटले होते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचाही सल्लाही त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानावर टीका होत असताना एल अँड टी कंपनीने यावर स्पष्टीकरण देत, “काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते”, असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आठ दशकांहून अधिक काळ, आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत. आम्हाला वाटते की, हे दशक भारताचे आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.”

कंपनीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आमच्या अध्यक्षांची विधाने काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे दर्शवतात. एल अँड टी मध्ये आम्ही अशी संस्कृती जोपासतो जिथे आवड, उद्देश आणि कामगिरी आम्हाला पुढे घेऊन जाईल.”

हे ही वाचा : रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

याचा मला पश्चात्ताप…

कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम म्हणाले होते की, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.”

ते पुढे म्हणाले होते की, “रविवारी घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”

हे ही वाचा : “कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार

विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया

एसएन सुब्रह्मण्यम यांच्या या विधानावर संताप व्यक्त करत माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा म्हणाली, “त्याने (कर्मचाऱ्याने) आपल्या पत्नीकडे का पाहू नये? हे दुःखद आहे की, इतके सुशिक्षित आणि मोठ्या संस्थांच्या सर्वोच्च पदांवर असलेले लोकही मानसिक आरोग्य आणि विश्रांतीला गांभीर्याने घेत नाहीत. ते अशी महिलाद्वेषी विधाने करत स्वतःलाच उघडे पाडत आहेत. हे निराशाजनक आणि भयानक आहे!”

एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानानंतर उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, “आठवड्यातून ९० तास काम करायचे का? रविवारचे नाव बदलून ‘सन-ड्युटी’ का ठेऊ नये?” या पोस्टबरोबर गोयंका यांनी #WorkSmartNotSlave असा हॅश टॅगही वापरला आहे.

यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाने सोशल मीडिावर पोस्ट करत, इतक्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने यावेळी मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.


मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: L and t defends chairman amid backlash over comments aam