L K Advani : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना पुन्हा एकदा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिन्याभरापूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (६ ऑगस्ट) पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ९६ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे.
लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती बिघडली
लालकृष्ण आडवाणी ( L K Advani ) यांच्यावर डॉ. विनीत सुरी लक्ष ठेवून आहेत. मागील महिन्यातही लालकृष्ण आडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील महिन्यात त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २००२ ते २००४ या कालावधीत लालकृष्ण आडवाणी ( L K Advani ) देशाचे उपपंतप्रधान होते. तर १९९९ ते २००४ या कालावधीत लालकृष्ण आडवाणी ( L K Advani ) हे देशाचे गृहमंत्रीही होते.
अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लालकृष्ण आडवाणींना ( L K Advani ) गेल्या काही दिवसांपासून आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. याच वर्षी लालकृष्ण आडवाणी ( L K Advani ) यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च २०२४ या दिवशी लालकृष्ण आडवाणी ( L K Advani ) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. या औपचारिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. याआधी २०१५ लालकृष्ण आडवाणी यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं होतं. लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे नेते असाही लालकृष्ण आडवाणी यांचा लौकिक आहे.
लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म पाकिस्तानच्या कराचीमध्ये ८ नोव्हेंबर १९२७ रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. किशनचंद आडवाणी असं त्यांच्या वडिलांचं नाव. आडवाणींचं प्राथमिक शिक्षण कराचीतील एका हायस्कूलमध्ये झालं. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस कराचीतील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली देशाची फाळणी झाली आणि त्यावेळी आडवाणी कुटुंब पाकिस्तान सोडून दिल्लीत आलं.
स्वयंसेवक म्हणून कारकीर्द केली सुरु
दिल्लीत आल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून आपल्या पुढील कारकीर्दीला सुरुवात केली आणि पुढे ते संघाचे प्रचारक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असतानाच १९५७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर ते जनसंघाच्या खासदारांना त्यांच्या संसदीय कार्यात मदत करू लागले. १९५८ ते १९६३ या दरम्यान त्यांनी दिल्ली प्रदेश जनसंघाचं सचिवपद भूषवलं. १९६० मध्ये त्यांनी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणूनही पदभार सांभाळला. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी पूर्णवेळ राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.