भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी आपला राजीनामा मंगळवारी मागे घेतला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरध्वनीवरून अडवाणी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अडवाणी यांनी आपला राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला मात्र अडवाणी उपस्थित नव्हते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड होऊन २४ तास उलटायच्या आत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सर्व पदांचा सोमवारी राजीनामा दिला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी संसदीय मंडळ, निवडणूक समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.
शामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी घडविलेला भाजप आता उरलेला नाही, अशी बोचरी टीकाही अडवाणी यांनी आपल्या पत्रात केली होती. पक्षापेक्षा काही नेत्यांना स्वतःचाच कार्यक्रम पुढे रेटण्यात जास्त रस आहे. पक्ष सध्या ज्या दिशेने पुढे चालला आहे. ते बघता पक्षासोबत पुढे जाणे आता अवघड असल्याचे अडवाणी यांनी म्हटले होते.
अडवाणी यांनी राजीनामा पत्रात उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा पक्ष गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
अडवाणींच्या राजीनाम्यानंतर भाजपमधील सर्वच नेते सोमवारी दुपारपासून सातत्याने त्यांच्याशी चर्चा करीत होते. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी सगळेचजण प्रयत्नशील होते. मंगळवारी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि अडवाणी यांच्यात सुमारे तीन तास चर्चा झाली. त्याचबरोबर सुषमा स्वराज आणि अडवाणी यांच्यमध्येही चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी राजनाथसिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अडवाणी यांनी राजीनामा मागे घेतला असल्याचे सांगितले.

Story img Loader