मॅगीनंतर नेस्ले कंपनीच्या ‘मॅगी पाझ्ता’ नावाने विकल्या जाणाऱ्या पास्त्यात शिशाचे प्रमाण जास्त आढळल्यानंतर ही कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर कंपनीची उत्पादने सुरक्षित असल्याचा दावा करत यासंदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढणार असल्याचे कंपनीने सांगितले.

उत्तरप्रदेश सरकारने आपल्या लखनौच्या प्रयोगशाळेत नेस्लेच्या पास्ताचे नमुने तपासले होते. त्यात शिसे प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेचे निष्कर्ष आपल्यापर्यंत आले नसल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असले तरी कंपनीचे उत्पादन असलेला पास्ता शंभर टक्के सुरक्षित आहे. पास्त्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे पदार्थ उत्पादनप्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर कठोर चाचणीला सामोरे जातात. यासंदर्भात प्रसारमाध्यमांतून आलेल्य बातम्यांची आम्ही शहानिशा करत आहोत. या बातम्यांमुळे उडालेल्या गोंधळाबद्दल आम्ही क्षमा मागतो. परंतु, ही उत्पादने खाण्यास सुरक्षित आहेत, असे नेस्लेच्या प्रवक्त्याने सांगितले.
शिशाचे प्रमाण २.५ पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) पर्यंत असणे अपेक्षित आहे. परंतु, लखनौच्या राष्ट्रीय अन्न पृथक्करण प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत हे प्रमाण ६ पीपीएम इतके असल्याचे आढळले. त्याचे निष्कर्ष अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे पाठवण्यात आले असून आम्ही त्यांच्या निर्देशांची प्रतीक्षा करत आहोत, असे या विभागाचे अधिकारी अरविंद यादव यांन सांगितले. जूनमध्ये ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ने मॅगीचे सेवन आरोग्यास अपायकारक असल्याचे सांगत तिच्यावर बंदी घातली होती. त्यामुळे कंपनीला आपले हे लोकप्रिय उत्पादन बाजारातून माघारी बोलवावे लागले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीची पुन्हा चाचणी करण्याचे आदेश तीन प्रयोगशाळांना दिले. या चाचण्यांत मॅगी उत्तीर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिच्यावरील बंदी उठवली.
त्यानंतर आता देशातल्या शंभर शहरांमध्ये तिचे वितरण पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, अजूनही आठ राज्यांमध्ये मॅगीवरील बंदी कायम आहे.

Story img Loader