आम आदमी पार्टी अर्थात आप या पक्षाने पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकली आहे. आपने या निवडणुकीत काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना घाम फोडला. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आपने नवज्योतसिंग सिद्धू, चरणजितसिंग चन्नी अशा दिग्गज नेत्यांचा पराभव केला. चन्नी यांचा पराभव करणाऱे आपचे आमदार लाभसिंग उगोके यांची तर विशेष चर्चा होत असून त्यांची आई आपला मुलगा आमदार झालेला असला तरी अजूनही शाळेत जाऊन सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. सफाई करतानाचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.
एएनआयने याबाबत अधिक वृत्त दिलं आहे. लाभसिंग उगोके यांनी चरणजितसिंग यांचा भदौर या मतदारसंघातून तब्बल ३७५५० मतांच्या फरकाने पराभव केला. लाभसिंग उगोके स्वत मोबाईल दुरुस्तीच्या दुकानावर काम करतात. तर त्यांची आई म्हणजेच बलदेव कौर आजही सरकारी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करते. बलदेव कौर यांना आपला मुलागा आमदार झाल्याबद्दल आनंद वाटतोय. मात्र अजूनही त्या सफाईचे काम सुरुच ठेवणार आहेत. “माझा मुलगा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होता. पण तो नक्की जिंकणार असा मला विश्वास होता. आम्ही पैशांसाठी मोठे कष्ट केलेले आहेत. माझा मुलगा आज आमदार झाला असला तरी मी सफाई कर्मचारी म्हणून काम करत राहील,” असं कौर यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे आमदार झालेले उगोके यांनीदेखील त्यांची आई सफाईकाम करत असलेल्या शाळेतूनच शिक्षण घेतल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले. “मागील अनेक वर्षांपासून लाभसिंग उगोके यांची आई या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करते. लाभसिंग यांनीदेखील याच शाळेतून शिक्षण घेतलेलं असून शाळा तसेच गावासाठी त्यांनी यापूर्वी अनेकवेळा गौरवपूर्ण कामगिरी केलेली आहे. मुलगा आमदार झालेला असला तरी त्यांच्या आईला शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायची इच्छा आहे,” असं शाळेच्या मुख्य्याध्यापिकेने सांगितलं.
दरम्यान, उगोके यांच्या वडिलांनीदेखील आमचा मुलगा आमदार झालेला असला तरी आम्ही पूर्वीसारखंच राहणार आहोत, असं सांगितलं. “लाभसिंगला येथील जनतेने निवडून दिलं आहे. त्यामुळे आमची काळजी करण्याऐवजी त्याने येथील लोकांसाठी काम करावं,” असं त्यांच्या वडिलांनी म्हटलंय. आपने या निवडणुकीत तब्बल ९२ जागांवर विजय मिळवलेला आहे. तर काँग्रेसला पक्त १८ जागांवर विजय मिळवता आलाय.