गुजरातमधील सूरतमध्ये कार चालकाने रस्त्यावर झोपलेल्या लहान मुलावर गाडी घातल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्हीआयपी रोडसमोर असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरु होतं. यावेळी येथे काम करणाऱ्या एका महिलने आपल्या लहान मुलाला अंगावर दुपट्टा टाकून गटाराच्या झाकणावर झोपवलं होतं. तेथून जाणाऱ्या कार चालकाने रस्त्यावर कपडा पडलेला आहे असं समजत लहान मुलावर गाडी घातली. जखमी अवस्थेत मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदीप गुप्ता असं या कारचालकाचं नाव आहे .
खटोदरा पोलिसांनी कारचालक संदीप गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी काम करणाऱ्या अरुण पारगी या महिलेने आपल्या एक वर्षाच्या मुलाला रडत असल्याने दूध पाजलं आणि तिथे कपड्याने झाकून झाकणावर झोपवलं होतं. ऊन लागू नये यासाठी तिने बाळाच्या अंगावर ओढणी टाकली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर कारचालक 10 मीटर अंतरावर जाऊन थांबला होता. पण गर्दी वाढू लागल्यानंतर त्याने पळ काढला. कार अत्यंत कमी वेगाने जात होती. असं वाटलं की त्याच्या लक्षातच आलं नाही. कारच्या पुढील दोन चाकांखाली बाळ आलं होतं’.
दुसरीकडे कारचालकाचं म्हणणं आहे की, ‘मला रस्त्यात ओढणी पडली आहे असं वाटलं. जाणुनबुजून केलेलं नाही’. ही कार पिनल पटेल यांच्या मालकीची आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.