पीटीआय, नवी दिल्ली
गेल्या चार वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला तणाव निवळण्याच्या दृष्टीने बुधवारी भारत-चीनने रचनात्मक आणि भविष्याच्या दृष्टीने चर्चा केली. तथापि, या चर्चेचे फलित मात्र काहीच मिळाले नाही. विशेष म्हणजे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे समकक्ष चीनचे मुत्सद्दी वांग यी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर काही दिवसांनी ही चर्चा झाली.
दोन्ही देशांदरम्यान झालेली ही चर्चा रचनात्मक आणि दूरदर्शी असल्याचे स्पष्ट करीत दोन्ही देशांनी सीमेवर प्रारंभिक द्विपक्षीय करार आणि नियमानुसार शांतता व सौंहार्र्द कायम राखण्यावर भर दिला. तथापि, या चर्चेतून सीमेवरील तिढा सुटण्याचे कोणतेही संकेत प्राप्त झाले नाहीत. चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे सीमा आणि महानगरीय विभागाचे महासंचालक हांग लियांग यांनी तर भारतातर्फे परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पूर्व आशिया) गौरांगलाल दास यांनी केले. दोन्ही देशांनी सीमेवरील तणाव दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा केली, असे मंत्रालयाने सांगितले.
चार वर्षांपासून तणाव
मे २०२० पासून भारत आणि चीन सैन्यामध्ये सीमेवर अद्यापही तणाव कायम आहे. तथापि, दोन्ही बाजूंचे सैनिक वादग्रस्त स्थळापासून दूर झाले आहेत. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, जो गेल्या काही दशकांतील सर्वांत भीषण संघर्ष होता. जोपर्यंत चीनबरोबरचे संबंध सामान्य होत नाही तोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होणे अशक्य असल्याचे भारताचे मत आहे. भारताने देपसांग आणि डेमचोक भागातून चीनी सैन्याला हटविण्यासाठी दबाव वाढविला आहे.