नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून लडाख सीमेवर असलेला तणाव निवळत असून गोग्रा-हॉटस्प्रिंग भागात तळ टाकून बसलेल्या भारत आणि चीनच्या सैन्यांची ‘धोरणात्मक माघार’ सुरू झाली आहे. भारत आणि चीनच्या सैन्यदलांनी सादर केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली.
२०२०मध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर डोकलाममध्ये मोठी चकमक झडली होती. त्यानंतर लडाख सीमेवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. जुलै महिन्यात दोन्ही सैन्यदलांमध्ये कमांडर पातळीवर चर्चेची १६वी फेरी झाली होती. त्यात निश्चित झालेल्या धोरणानुसार पेट्रोिलग चौकी क्रमांक १५ (पीपी-१५) येथील सैन्यांची माघार गुरुवारी सुरू झाल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सीमेवर शांतता आणि सौदार्ह प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मोदी-जिनपिंग भेट?
पुढल्या आठवडय़ात उझबेकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य परिषदेची वार्षिक सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची यावेळी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीपूर्वी लडाखमधील कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेल्याचे मानले जात आहे.